
लखनऊ : कुस्तीपटू आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील वादावादी अजूनही सुरुच आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 6 जुलै रोजी होणार आहे. तर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटू यांच्यामध्ये झालेल्या संवादात ब्रिजभूषण आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. भाजप खासदारांच्या कुटुंबातील काही सदस्यांना निवडणूक लढवायची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे आता दबाव तंत्राचे आणि डावपेचाचे राजकारण सुरू होत आहे का? असा सवाल आता भाजपचे आमदार देवेंद्र प्रताप सिंह यांच्या पत्रानंतर उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
गोरखपूरचे रहिवासी असलेल्या देवेंद्रने ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे.
त्यांनी ब्रिजभूषण यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसे झाले नाही तर लोकशाहीची हत्या होत असल्याचे त्यांचे मत आहे.
देवेंद्र हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे समर्थक मानले जातात. तर हे दोन्ही नेते एकेकाळी समाजवादी पक्षात होते असंही त्यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र यांनी या महिला कुस्तीपटूंना मोदींच्या विरोधकांचे टूल किट असा त्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. कुस्तीपटूंचे आंदोलन हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे त्या पत्रात नमूद केल्याचे म्हटले आहे. देवेंद्र प्रताप यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिजभूषण यांच्या कुटुंबीयांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली नाही, तर तो एक प्रकारे उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचाही अपमान आहे असं त्यांनी म्हटले आहे.
आजवर भाजपचा एकही नेता ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ उघडपणे पुढे आलेला नाही. मात्र यूपीच्या राजकारणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रिजभूषण हे एकमेकांच्या विरोधक असल्याचे सांगितले जाते. नुकताच गोंडा येथील भाजपच्या एका कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या फोटोत भाजपचे यूपी अध्यक्ष भूपेंद्र चौधरी ब्रिजभूषण यांच्यासमोर हात जोडून मंचावर उभे होते. तर सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले ब्रिजभूषण यांची प्रतिमा ही एका तगड्या नेत्याची असल्याचे मत यूपीच्या नेत्यांचे आहे. महिला कुस्तीपटूंच्या आरोपानंतर ब्रिजभूषण तुरुंगात असायला हवे होते, असे योगगुरू रामदेव यांनी त्यांच्याबद्दल म्हटले होते.
भाजपचे देवेंद्र प्रताप सिंह यांनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिल्यानंतर ते मीडियामध्ये प्रसिद्ध केले. त्यांचे पत्र प्रसिद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर अन्याय होत असल्याचा संदेश गेला पाहिजे, असं मत व्यक्त करत जर तो कुस्ती संघटनेची निवडणूक ते लढवत नसतील तर किमान त्याच्या कुटुंबीयांना तरी त्यातून ही सूट मिळायला हवी असं मतही व्यक्त करण्यात आले आहे.