पहिल्या बायकोला खूश ठेवण्यासाठी दुसरीला बनवलं बहीण, त्या एका चॅटमुळे फुटलं बिंग, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पहिल्या बायकोला खूश ठेवण्यासाठी नवऱ्याने दुसऱ्या बायकोला मानलेली बहिण असल्याचे सांगितले. तिचे दुसरे लग्न लावून दिले. त्यानंतर मोबाईल चॅटमुळे धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

पहिल्या बायकोला खूश ठेवण्यासाठी दुसरीला बनवलं बहीण, त्या एका चॅटमुळे फुटलं बिंग, नेमकं काय घडलं?
Affair
Image Credit source: Freepik
| Updated on: Jun 01, 2026 | 3:55 PM

आपण दररोज अनेक फसवणुकीच्या घटना ऐकत असतो. पण एक अशी धक्कादायक आणि अनोखी घटना समोर आली आहे जी ऐकून पोलीसही थक्क झाले आहेत. एका पुरुषाने स्वत:च्या बायकोलाच एका साध्याभोळ्या व्यक्तीसमोर बहिण असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर जे घडले, ते कोणाचीही झोप उडवणारे आहे. आता नेमकं काय घडलं? वाचा…

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून हे प्रकरण समोर आले आहे. येथील झाशीरोड पोलीस ठाण्याने लग्नाच्या नावाखाली मोठी रक्कम उकळणाऱ्या आणि बोगस विवाह लावून देणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मास्टरमाइंड अजय ऊर्फ सोनू चौहान याने स्वतःच्याच दुसऱ्या पत्नीला गरीब आणि अनाथ ‘मानलेली बहीण’ भासवून एका साध्याभोळ्या व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिले. खरेतर, या संपूर्ण कटाचा उद्देश लग्नानंतर काही काळाने पीडित कुटुंबाला कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणे हा होता. पोलिसांनी मुख्य आरोपी पती अजय चौहान आणि त्याची पत्नी राधा ऊर्फ दीक्षा हिच्यासह त्याला ताब्यात घेतले आहे.

जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयात टीम लीडर म्हणून कार्यरत असलेल्या रतन शर्मा यांच्यासोबत हा संपूर्ण कट रचण्यात आला. पीडित कुटुंबाला १५ एप्रिल रोजी सोनू तिवारी नावाच्या एका व्यक्तीने हे स्थळ सुचवले होते. त्यांना सांगण्यात आले की, अजय चौहान आपली एक गरीब, अनाथ आणि मानलेली बहीण राधा ऊर्फ दीक्षा मुद्गल हिचे लग्न करून देऊ इच्छितो. २० एप्रिल रोजी मुलगी दाखवण्यात आली आणि कुटुंबाला स्थळ पसंत पडल्यानंतर २७ एप्रिल रोजी साखरपुडा झाला. त्यानंतर ७ मे रोजी हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचाही थाटामाटात विवाह संपन्न झाला, ज्यामध्ये लग्न आणि दागिन्यांच्या नावाखाली पीडित रतन शर्मा यांचे सुमारे ६ लाख रुपये खर्च झाले. एवढेच नाही तर, आरोपींनी ब्युटी पार्लर आणि इतर खर्चाच्या नावाखाली ५० हजार रुपये वेगळे उकळले.

व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ‘पती-पत्नी’चे बिंग

लग्नानंतर जेव्हा नवरी राधा ऊर्फ दीक्षा तिच्या नवीन घरी म्हणजे रतन शर्मा यांच्याकडे राहायला लागली, तेव्हा तिच्या संशयास्पद हालचालींमुळे कुटुंबाला संशय आला. ती दिवस-रात्र लपूनछपून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असायची. एके दिवशी जेव्हा तिचा मोबाईल तपासण्यात आला, तेव्हा तिच्या व्हॉट्सॲप चॅटमधून एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला. चॅटवरून समजले की, ज्याला अजय चौहान आपली बहीण सांगत होता, ती प्रत्यक्षात त्याची पत्नी आहे. दोघांनी २०२४ मध्ये आग्रा येथील एका आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता आणि दोघे एकत्र राहत होते.

पहिल्या पत्नीला खूश ठेवण्यासाठी रचला डाव

पोलीस तपासात हेही समोर आले आहे की, मुख्य आरोपी अजय चौहान याचे पहिले लग्न २००९ मध्ये झाले असून पहिल्या पत्नीपासून त्याला मुलेही आहेत. दीक्षा ही त्याची दुसरी पत्नी होती. अजयने आपली पहिली पत्नी आणि मुलांना खूश ठेवण्यासाठी, त्यांचा खर्च उचलण्यासाठी आणि केवळ दिखाव्यासाठी आपली ही दुसरी पत्नी दीक्षा हिचे लग्न रतन शर्मा यांच्याशी लावून दिले होते, जेणेकरून नंतर ब्लॅकमेल करून मोठी रक्कम वसूल करता येईल. झाशीरोड पोलीस ठाण्याचे प्रभारी शक्ती सिंग यादव यांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अजय चौहान याला शनिवारी अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस आता या टोळीत सामील असलेल्या सोनू तिवारीसह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us