
आपण रस्त्यावरून जाताना हमखास एखाद्या कोपऱ्यावर किंवा पोस्ट ऑफिससमोर उभा असलेला एक लाल रंगाचा पत्रपेटी पाहिला असेल. पण कधी विचार केला आहे का की ही पत्रपेटी लाल रंगाचीच का असते? नेहमीसारखा विषय वाटत असला, तरी यामागे इतिहास, विज्ञान आणि प्रशासनिक निर्णय यांचा एक जुना संदर्भ लपलेला आहे.
भारतात डाक सेवा अर्थात पोस्टल सर्व्हिसची सुरुवात ब्रिटीश काळात झाली होती. 1854 साली लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात ही सेवा सुरु करण्यात आली. त्या काळात पत्रव्यवहार हेच आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याचं एकमेव आणि विश्वासार्ह साधन होतं. मात्र, सुरुवातीच्या काळात या पत्रपेट्यांचा रंग लाल नसून हिरवा होता.
ब्रिटीश शासनाच्या प्रारंभीच्या काळात हिरव्या रंगाचे पोस्ट बॉक्स वापरले जात होते. मात्र, हिरवा रंग नैसर्गिक वातावरणात सहज मिसळतो आणि त्यामुळे लोकांना त्याचे स्थान शोधणं कठीण जायचं. या अडचणींमुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर, 1874 साली म्हणजेच पोस्टल सेवेला सुरुवात होऊन २० वर्षांनी, एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे पोस्ट बॉक्सचा रंग लाल करण्याचा!
या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण भारतभर करताना जवळपास 10 वर्षे लागली. मात्र एकदा का लाल रंगाचा वापर सुरू झाला, तेव्हा त्याचे फायदे लगेच दिसून आले.
लाल रंगाची निवड ही केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून नव्हती. या रंगाचं एक वैज्ञानिक कारणही आहे. लाल रंगाच्या लाटांची लांबी (वेव्हलेंथ) सर्व रंगांमध्ये सर्वात जास्त असते आणि त्याची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते. त्यामुळे हा रंग लांबूनही स्पष्टपणे दिसतो. याशिवाय, लाल रंग अत्यंत लक्षवेधी आणि इमर्जन्सी संकेतांमध्ये वापरण्यात येणारा रंग आहे, जो डाकसेवेच्या महत्त्वाचं प्रतीक ठरतो.
ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावामुळे केवळ भारतातच नव्हे, तर इतर अनेक राष्ट्रांमध्येही लाल रंगाचे पोस्ट बॉक्स वापरले गेले. अर्थात काही देशांमध्ये त्यांच्या गरजेनुसार वेगळ्या रंगांचे पोस्ट बॉक्स वापरले जातात.
आजही लाल रंगाचं महत्त्व अबाधित आहे. मात्र, भारतीय डाक विभागाने काही विशिष्ट सेवांसाठी वेगळ्या रंगांचे पत्रपेट्या सुरू केल्या आहेत:
1. हिरवा रंग: स्थानिक (लोकल) पत्रव्यवहारासाठी
2. निळा रंग: मेट्रो शहरांमध्ये जाणाऱ्या पत्रांसाठी
3. पिवळा रंग: राज्यांच्या राजधानीत जाणाऱ्या पत्रांसाठी
तरीही, सामान्य रस्त्यांवर दिसणाऱ्या पोस्ट बॉक्सपैकी बहुतांश अजूनही पारंपरिक लाल रंगाचेच आहेत.