
तुम्ही जेव्हा कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमची नजर तिथे कशावर पडते? प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनच्या नावाचा एक बोर्ड लिहिलेला असतो, सर्वात आधी आपली नजर त्या नावावर पडते. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर जा, तिथे त्या स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, तो नेहमी पिवळ्याच रंगाचा असतो. त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या रेल्वे स्टेशनचं नावं लिहिलेलं असतं. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळाच का असतो? काळा, हिरवा, लाल किंवा इतर रंगाचा हा बोर्ड का नसतो? रेल्वे स्टेशनचं नाव हे नेहमी पिवळ्याच बोर्डवर लिहिलं जातं, यामागे केवळ परंपरा नाहीये, तर त्यामागे अनेक कारणं देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कारणांबाबत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी
पिवळा रंग हा दुरून लवकर आणि स्पष्ट दिसतो. कडाक्याचं ऊन असो, धुकं असो किंवा रात्र असो. अशा प्रत्यक स्थितीमध्ये पिवळा कलर हा दुरून सहज आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मवरून भरधाव वेगात जात असते, तेव्हा देखील या पिवळ्या रंगाच्या बोर्डमुळे आपण त्या स्टेशनचं नाव सहज वाचू शकतो, आणि पुढे कोणतं स्टेशन येणार आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. पिवळ्या पाटीवर काळी अक्षर अधिक ठळकपणे दिसतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेस्टेशनचे बोर्ड हे नेहमी पिवळेच असतात, आणि त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या -त्या स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं.
भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात धुकं पडतं, अशा स्थितीमध्ये जर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड असेल तर तो सहजपणे आपल्याला वाचता येणार नाही, मात्र रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळा असल्यामुळे तो सहज वाचता येतो. रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा या बोर्डवर लाईटचा प्रकाश पडतो, तेव्हा तो तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसतो, मात्र त्याऐवजी एखाद्या दुसऱ्या रंगाचा बोर्ड असेल तर तो तुम्हाला स्पष्ट दिसेलच याची खात्री नसते, त्यामुळे रेल्वेचा बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचाच असतो. तसेच रेल्वेच्या चालकांना देखील ट्रेन चालवत असताना बोर्ड स्पष्टपणे दिसणं गरजेच असतं, त्यासाठी देखील नेहमी रेल्वे स्टेशनच्या बोर्डाला पिवळाच कलर दिला जातो.