
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जगाचा तेल आणि LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतातही गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर सरकारने नियंत्रण आणले आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशातच तेल कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 14.2 किलोऐवजी 10 किलो गॅस भरणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे उपलब्ध गॅसमध्ये जास्तीत जास्त गॅस सिलिंडर भरण्याची योजना असल्याचे बोलले जात होते. आता सरकारने यावर आपली भूमिका मांडली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
गॅस सिलिंडरमध्ये 14.2 किलोऐवजी 10 किलो गॅस भरण्याच्या बातमीवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांनी, ‘घरगुती LPG सिलेंडरचे वजन 14.2 किलोवरून 10 किलो करण्याबाबत सुरू असलेली चर्चा ही केवळ अफवा आहे. अशा सरकार अफवांवर प्रतिक्रिया देत नाही. नागरिकांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये’ अशी माहिती दिली. गुजरातमध्ये पेट्रोल पंपावर इंधन संपल्याच्या बातमीवर बोलताना सचिवांनी म्हटले की, ‘सर्व पेट्रोल पंप सामान्यपणे सुरू आहेत. कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची कमतरता नाही.’
देशातील इंधनाच्या स्थितीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितले की, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खत होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येतात. युद्धानंतर जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा फारसा बाधित होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60 टक्के एलपीजी आयात करतो. पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने सरकारने घरगुती वापराला प्राधान्य दिले असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठीही उपाय योजना केल्या जात आहेत.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘भारताने ऊर्जा आयात विविध देशांमधून करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी 27 देशांमधून होणारी आयात आता 41 देशांपर्यंत वाढवली आहे. भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन तेलसाठा आहे आणि तो 65 लाखांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कंपन्यांकडेही वेगळे साठे आहेत.’