
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील कारभारावर जोरदार टीका केली आहे. पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती खरेदी केली जात होती. आता त्या ठिकाणी सुशासन आहे. लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असं सांगतानाच वेळ आल्यावर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असं मनोज सिन्हा यांनी सांगितलं.
टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेतील सत्ता संमेलनात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले. जम्मू-काश्मीरमध्ये आजही सर्व धर्माच्या लोकांना त्यांचे सण-उत्सव साजरे करण्याचं स्वातंत्र आहे. आता तिथलं चित्र पूर्णपणे बदललं आहे. आता तिथे कोणीही जमीन खरेदी करू शकतं. काश्मिरी पंडीत स्वत:ला बलशाली समजत आहेत, असं मनोज सिन्हा म्हणाले.
पूर्वीच्या तुलनेत आता काश्मीरचं चित्र बदललं आहे. काश्मिरी तरुण रात्री 11 वाजता झेलम नदीच्या किनारी बसून गिटार वाजवताना दिसत आहेत. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर काश्मीर बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या धोरणामुळे हे शक्य झालं आहे. दिल्लीतील आताचं सरकार शांती खरेदी करण्यावर विश्वास ठेवत नाही. पूर्वी शांती खरेदी केली जायची. आता दिल्ली सरकार आणि जम्मू-काश्मीरचं प्रशासन या ठिकाणी कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यावर विश्वास ठेवत आहे. या ठिकाणी गुड गव्हर्नेस आहे, असं मनोज सिन्हा म्हणाले.
शांती कशी खरेदी केली जायची? तुमच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी स्पष्ट केलं. जे लोक शांतता प्रस्थापित होण्यास अडचणी निर्माण करत होते, त्यांच्याशीच पूर्वी चर्चा केली जायची. ज्या लोकांना तुरुंगात असायला हवं होतं, त्यांना सरकारी विमानाने श्रीनगरहून दिल्लीला बोलावलं जायचं. त्यांच्याशी चर्चा केली जायची. मी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या नंतर दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या 54 लोकांना सरकारी नोकरीतून बाहेर काढलं. अनेक दहशतवाद्यांच्या कुटुंबातील लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये होते, असं मनोज सिन्हा म्हणाले.
काश्मीरमध्ये गेल्या चार वर्षात अनेक बदल झाले आहेत. देशातील लोकशाहीत प्रत्येकाला काहीही म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तिथे किती हिंसक घटना घडल्या? किती लोक माहले गेले? आणि सुरक्षा दलाचे किती जवान मारले गेले? गेल्या चार वर्षाची त्याआधीच्या चार वर्षाशी तुलना केली तर या ठिकाणी हिंसक घटनांमध्ये 75 टक्के घट झाली आहे. आता तिथे तिरंगा यात्रा असो की मेरी माटी, मेरा देश सारखे कार्यक्रम होत आहेत. पूर्वी हल्ल्यांमुळे चर्चा व्हायची. परंतु, काही लोकांना हा बदल समजलेला नाही. पूर्वी अंधारून येताच घरी कधी जातो असं व्हायचं. आता तुम्ही श्रीनगरला या तरुण तुम्हाला लेट नाईटचा आनंद घेताना दिसतील, असंही त्यांनी सांगितलं.