Kharge vs Modi: तुम्ही पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत, खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान मोदी अहंकारी असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

Kharge vs Modi: तुम्ही पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत, खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Kharge and Modi
| Updated on: Jul 29, 2025 | 5:29 PM

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये प्रचार करण्याऐवजी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी व्हायला हवे होते. सरकार आमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. पंतप्रधान मोदी अहंकारी असल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही नेहमी पाकिस्तानचा आणि ते दहशतवाद्यांना देत असलेल्या पाठिंब्याचा निषेध केला आहे आणि पुढेही करू. आम्ही विरोध करत असताना मोदीजी मेजवानीला जातात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठी मारतात. पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधी आपला दौरा रद्द केला होता. मी याचे उत्तर मागितले होते पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही असं खरगे यांनी म्हटले आहे.

सरकारला हल्ल्याचा अंदाज होता का?

मल्लिकार्जुन खरगे पुढे बोलताना म्हणाले की, ‘सरकारला या हल्ल्याचा अंदाज होता का? जर असेल तर तुम्ही पर्यटकांना तिथे का जाऊ दिले? गृहमंत्री अमित शहा जम्मू आणि काश्मीरमध्ये म्हणाले होते की, मोदी सरकारच्या कठोर पावलांमुळे दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. जर असे झाले असते तर पहलगाममध्ये हल्ला कसा झाला? असा प्रश्नही खरगे यांनी उपस्थित केला आहे.

आमची पत्रे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पहलगाम हल्ला झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होतो. त्यावेळी सरकारने वेळ आल्यावर उत्तर देऊ असं म्हटलं होतं. आम्ही याबाबत पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते, मात्र आम्हाला उत्तर मिळाले नाही. आम्ही पाठवलेली पत्रे कचऱ्याच्या पेटीत टाकली जातात. जर तुमच्यात इतका अहंकार असेल तर एक तुमचा अहंकार तोडणारे लोक नक्कीच सत्तेत येतील.

तुम्ही पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायक नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना खरगे म्हणाले की, ‘पंतप्रधानांकडे लोकांना मिठी मारण्यासाठी वेळ आहे पण विरोधकांना उत्तर देण्यासाठी वेळ नाही. आम्ही सर्वपक्षीय बैठकीला हजर होतो, मात्र ते बिहारला निवडणूक प्रचारासाठी गेले होते. ही तुमची देशभक्ती आहे का? आजही मोदींनी सभागृहात बसायला हवे होते. जर तुमच्यात ऐकण्याची क्षमता नसेल तर तुम्ही पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत.’