
हेरगिरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला मोठा झटका लागला आहे. हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनमधून डीलिट केलेला डाटा रिकव्हर केला आहे. या डाटातून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासात असे काही पुरावे सापडलेत की या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिसांना जाता येणार आहे. त्यामुळे ज्योतीचं पाकिस्तानशी असलेलं कनेक्शन, तिथल्या लोकांशी झालेला संवाद आणि काही गोष्टींची झालेली देवाणघेवाण या सर्व गोष्टी उजेडात येणार असल्याने ज्योतीचा पाय खोलात गेला असून आता या प्रकरणातून तिला देवही वाचवू शकणार नाही, अशी चर्चा सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हर डाटामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित पीआयओ (Pakistan Intelligence Operative)शी संवाद झाल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच एक संदिग्ध पाकिस्तानी अधिकारी दानिशचं नावही समोर आलं आहे. हा अधिकारी दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासात कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी ज्योतीकडून तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. या वस्तू डिजिटल फॉरेन्सिक चौकशीसाठी मधुबन, करनाल स्थित प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. मोबाईलमधून डीलिट केलेला डाटा आणि कॉल डिटेल्स रिकव्हर करण्यात आली आहे. पण लॅपटॉप डाटा अजून उपलब्ध व्हायचा बाकी आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मोबाईलमध्ये पाकिस्तानी संपर्क सूत्रांशी कॉल, व्हॉट्सअप चॅट आणि काही व्हिडीओ ट्रान्स्फर केल्याचं दिसून येत आहे.
हे प्रकरण केवळ हरियाणापर्यंत मर्यादित नाही. तर राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांची पथकंही हिसारला आले आहेत. त्यांनी ज्योतीची कसून चौकशीही केली आहे. ज्योतीने ज्या ठिकाणचे व्हिडीओ युट्यूबवर टाकले होते, त्याची माहितीही गोवा आणि यूपी पोलिसांनी घेतली आहे. व्हिडीओ का शूट केले? कुणाला पाठवले आणि त्याचा हेतू काय होता? यावर चौकशीचा मुख्य फोकस ठेवण्यात आला आहे. ज्योती केवळ युट्यूबसाठी प्रवास करत नव्हती. तर भारताच्या सुरक्षा एजन्सीची माहिती मिळवून ती समोरच्यांना पुरवण्यासाठीच तिचे दौरे व्हायचे, असं चौकशी यंत्रणांचं म्हणणं आहे.
ज्योतीला कोर्टाने 22 मे रोजी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नंतर कोर्टाने चार दिवसाची कोठडी सुनावली. रिमांडमध्ये असताना ज्योतीची सलग गहन चौकशी करण्यात आली. तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी करण्यात आली. यातून अनेक रहस्य समोर आली आहेत. आता पोलीस तिसऱ्यांदा तिचा रिमांड मागणार की कोर्ट तिला न्यायालयीन कोठडी सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या तपास यंत्रणा अनेक स्तरावर काम करत आहेत. ज्योतीने पाकिस्तान, दुबई, थायलंड, चीन सारख्या देशांचा प्रवास केला होता. एका साध्या युट्यूबरकडे एवढे देश फिरायला पैसे कुठून आले? हा सवाल आहे. पोलीस तिच्या वडिलांच्या बँक खात्याचीही बारकाईने तपासणी करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या खात्यांमध्ये संदिग्ध ट्रॅन्जॅक्शन सापडलं आहे. याच्या देवाणघेवाणीची सत्यता, स्त्रोत आणि उद्देशाची माहिती हाती आली आहे. बँकेकडून रिपोर्ट मागण्यात आले आहेत. हे रिपोर्ट आल्यावर अधिक माहिती समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.