घराची दारं बंद होणार का?

घराची दारं बंद होणार का?

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई   मला आठवतयं मी साधारण बारा वर्षांचा असेल, त्यावेळी आमच्या बार्शी तालुक्यात भला मोठा दुष्काळ पडला होता. काहीही न कळण्याचं ते वय होतं, मात्र डोळे किलकिले करायचे ती वेळ पापण्यांसमोर तरळत होती. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतं होती. आजोबा खांद्यावरुन गावाच्या बाहेरुन दोन किलोमीटरवरुन पाणी आणायचे. पिण्यासाठी पाणी नाही […]

सचिन पाटील

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

मला आठवतयं मी साधारण बारा वर्षांचा असेल, त्यावेळी आमच्या बार्शी तालुक्यात भला मोठा दुष्काळ पडला होता. काहीही न कळण्याचं ते वय होतं, मात्र डोळे किलकिले करायचे ती वेळ पापण्यांसमोर तरळत होती. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतं होती. आजोबा खांद्यावरुन गावाच्या बाहेरुन दोन किलोमीटरवरुन पाणी आणायचे. पिण्यासाठी पाणी नाही म्हटल्यावर तिथं शेतीसाठी तरी पाणी कुठून येणार? एके दिवशी रात्री गावातल्या मध्यवर्ती मंदिरातून सूचना देण्यात आली की गावात छावणी मंजूर झाली आहे, आपापल्या जनावरांची नोंद करा. लागलीच शेतकऱ्यांनी धावपळ करायला सुरुवात केली आणि सगळ्या गावात एकच कालवा की आपली जनावरंही चारा छावणीत गेली पाहिजे. आमच्याकडेही त्यावेळेस 5 म्हशी असल्याने आम्हीही त्यामध्ये नोंदणी केली आणि जनावरे छावणीला लागली.

त्यावेळी परिस्थिती खूपचं भयानक होती. जनावरं ढेपाळली होती, दूध कमी झालं होतं. महत्वाचं म्हणजे दुधाचं काही का होईना पण दिवस ढकलला पाहिजे, एवढीच अपेक्षा त्यावेळेस केली जायची. मी मात्र आजोबांबरोबर रात्रभर छावणीत बसून राहायचो. असं म्हणतातं की काही वेळेस वय जरी कमी असलं तरी मनावर झालेला घाव खूपं काही शिकवून जातो. तसचं काहीसं त्यावेळेस झालं होतं.

सध्या अशीच वेळ आता राज्यावर आलेली आहे. त्यातूनच विषय सुचला की पुन्हा एकदा घराची दारं बंद होणार?

या वाक्याला तंतोतंत जुळणारी परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे. मानवाने कितीही तंत्रज्ञान विकसित केलं तरी निसर्गाच्या पुढे झुकावचं लागतं, याचा अनुभव दोन ,तीन वर्षाच्या फेरफारानंतर सतत येतोय असं जाणवतंय. काही केल्या वेळ काही सुधारत नाही आणि जे नशिबात आहे ते काय माघार घेत नाही, अशीचं अवस्था झाली आहे.

आता कुठे नोव्हेंबर महिना चालू आहे, पण आतापासूनच प्रत्येकाला पोटासाठी बाहेर पडण्याची, घरं सोडण्याची, गावं सोडण्याची वेळ आली आहे. यावेळी महाराजांचं वाक्य आठवतं की सर्वास पोटास लावणे आहे. हे वाक्य रयतेची काळजी कशी करावी आणि उत्तम राज्यकारभार करुन आपत्कालीन वेळी राज्य कसं चालवांव याचं हे उदाहरणं. असचं काहीसं आता राज्य सरकारला करावं लागणार आहे.

काही केल्या बळीराजाच्या नशिबाचं भोग मात्र सरायला तयार नाहीत. जमिनीला पडलेल्या भेगा आता काळजापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. घरामध्ये ना दिवाळी साजरी झाली ना पोरांना मनमुराद फटाके फोडता आले. का सारखी ही अशी कथा आमच्याच नशिबाला येतेय देव जाणे. जिथे समृद्धीची स्वप्ने पाहिली आज तिथेच पुन्हा एकदा ओसाड आणि भकास माळरान पाहावं लागणार आहे. सकाळ संध्याकाळ ज्या जनावरांना ओंजारायचं गोंजारायचं त्यांनाच कसायाच्या हवाली करताना जोराचा हुंदका फुटणार,जिथं शेतात कामं करुन संध्याकाळी मुलांसोबत घराच्या अंगणात आई बाबांबरोबर विचारमंथन व्हायचं, आज त्याच अंगणात कोणीही बसताना दिसणार नाही, कारणं तीच धरणीमाय आता जागा देणार नाही. फक्त एकच सवाल की आलेला दिवस ढकलायचा कसा?

ही परिस्थिती सारखं का ओढवतेयं? मला वाटतं राज्यातल्या धरणांचं वय संपलं, मात्र पाण्यावरती राजकारण करायचं काय थांबलं नाही. डरकाळ्या ऐकू येतील, आम्ही पाणी मिळवून देणार, पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मात्र त्याच शेतकरी बापाला आज पाणी मिळत नाही म्हणून जीव गमवावा लागतोय. यावेळी मात्र सहानुभुती दाखवण्यापलिकडे काय केलं जात नाही.

आज जवळजवळ निम्मा महाराष्ट्र पाणीटंचाईची समस्या भोगतोय, मराठवाडा मागच्याच महिन्यात टँकरवाडा झाला आहे. कुठेच आशेचे किरण दिसत नाहीत. अशी वेळ आता बळीराजावर आलेली आहे. 2016 मध्ये पुण्यातल्या एनसीएल नावाच्या संस्थेतल्या मुलांनी दुष्काळाचा दौरा केला आणि अक्षरश: ती मुलं पुण्यात आल्यावर रडत होती. कारण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा पाणी मिळत नाही म्हणून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय,यासारखी वाईट गोष्ट कोणती असावी? असा प्रश्न त्यांनाही भेडसावत होता. कधी शेतात पाणी नाही म्हणून आत्महत्या तर कधी मालाला भाव मिळाला नाही म्हणून सरणात उडी, हे आत्महत्येचं सत्र या राजाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आज घडीला सुरुच आहेत.

आज 288 तालुके दुष्काळग्रस्त झालेत. अजून खरा उन्हाळा तर लांबच आहे. त्याआधीच हे चटके बसायला सुरुवात झाल्याने पाण्याची लढाई मात्र अटळ आहे. ती लढाई लढावीच लागणार असं दिसतंय. ही लढाई लढण्याचं बळं माझ्या माय-बाप शेतकऱ्याच्या बाहूत यावं आणि रडून मरण्यापेक्षा,लढून पुन्हा अजून एकदा याला तोंड देऊया आणि घराची दारं जी बंद होणार आहेत ती काही काळापुरती होणार आहेत, मात्र पुढच्या वेळेस सुखाचं तोरणं लावायला आपण सज्ज होऊया आणि दुष्काळाशी दोन हात करुया, रडून नव्हे तर लढून. चला तर या आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करायला आपण तयार होऊया. आपली लढाई आता सुरु झाली आहे, आपली घराची दारंही सताड उघडी राहिली पाहिजे. हीच अपेक्षा ,आत्महत्या करु नका हेच शेतकरी पुत्राचं आवाहन.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें