संस्था आणि लोकहो, पूरग्रस्तांना मदत करताय? मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्याच

पूरग्रस्तांना असणारी गरज आणि दिली जाणारी मदत यामध्ये जर समन्वय नसेल तर पैसा, वेळ आणि श्रम हे वाया जातं. आपण हे 2019 च्या महापुरावेळी अनुभवलं आहे.

संस्था आणि लोकहो, पूरग्रस्तांना मदत करताय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्याच
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 31, 2021 | 5:00 AM

पूरग्रस्तांना असणारी गरज आणि दिली जाणारी मदत यामध्ये जर समन्वय नसेल तर पैसा, वेळ आणि श्रम हे वाया जातं. आपण 2019 च्या महापुरावेळी हे अनुभवलं आहे. सद्भावनेने पण भावनेच्या भरात दिलेली-जमा केलेली मदत परिस्थितीचे योग्य आकलन, संस्थांचा समन्वय आणि वेळेचे नियोजन न झाल्यास निरुपयोगी ठरू नये, यासाठी मदत करण्याआधी खालील मुद्दे लक्षात घ्या.

संस्थांसाठी सूचना :

1. मदतीसाठी आवाहन करण्याआधी स्थानिक प्रशासनाकडून काय व कुठे मदत दिली जातेय आणि त्या व्यतिरिक्त नेमकं काय गरजेचं आहे याचा आधी आढावा घ्या. आपल्या संस्थेपेक्षा प्रशासनाकडे फार मोठी यंत्रणा आहे. जिथे ते कमी पडतायत तिथं तुमचं मनुष्यबळ, सल्ला, माहिती देऊन मिळून काम केल्यास कामं लवकर होतील.

2. अडकलेल्या लोकांना आधी सुरक्षित बाहेर काढणे (rescue) आणि नंतर पुनर्वसन (rehabilitation) हा क्रम लक्षात घ्या. लोकांची राहण्याची सोय झाल्यानंतरच त्यांना किराणा वगैरे दिलं तर ते नीट ठेवू/वापरू शकतील. ते सांभाळण्याचं त्यांचं आणखी एक काम वाढवू नका. तोपर्यंत तयार जेवण देणं, घरं साफ करायला कार्यकर्ते, तात्पुरती डागडुजी करायला कुशल मनुष्यबळ पुरवणं हे महत्त्वाचं काम आहे.

3. आपण वस्तू स्वरूपात मदत जमा करत असाल तर आपलं ठिकाण ते घटनास्थळ इथपर्यंत सामान नेण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चाचा आधी अंदाज घ्या. जमा करत असलेल्या सामानाच्या किंमतीच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च वाहतुकीसाठी होणार असेल तर सामान जमा करू नका. सामानाची किंमत करताना कपड्यांची किंमत शून्य पकडा.

4. मदतीसाठी आवाहन करण्याआधी घटनास्थळी जाऊन काय व किती हवं आहे हे स्वतः पहा. सौम्य, मध्यम व तीव्र बाधित गावांची, त्यातील कुटुंबांची, माणसांची यादी करा. मदतीच्या योग्य विचारण्यासाठी आधी सर्वेक्षण महत्वाचं आहे.

5. यासाठी स्थानिकांची मदत घ्या पण ते जे सांगतायत ते स्वतः तपासा. कारण अशाही परिस्थितीत संधी साधू पाहणारे बरेच असतात. जे स्वतःला, आपल्या नातलगाना, जातभाईंनाच जास्त मदत कशी मिळेल यासाठी चुकीची माहिती पुरवत असतात.

6. वस्तूंचे वितरण करण्याआधी केलेल्या सर्वेक्षणा आधारे कुटुंबनिहाय किट तयार करा व स्वतः जाऊन घरोघरी ते वितरित करा म्हणजे गावात झुंबड उडणार नाही.

7. आपण मदत करतोय; उपकार नाही. त्यामुळे मदत घेताना व्यक्तींचे फोटो काढू नका. ते परिस्थितीने लाचार आहेत, त्यांचा स्वाभिमान दुखावेल असं वागू नका.

मदत देणाऱ्यांसाठी सूचना :

1. शक्यतो घटनास्थळाच्या जवळ काम करणाऱ्या स्थानिक संस्थेला आर्थिक मदत द्या किंवा तुम्ही थेट ओळखत असाल अशा संस्थेलाच मदत करा. आर्थिक मदत देताना वरील बाबी संस्था पाळतेय का हे तपासा आणि ही रक्कम नेमकी कशासाठी/कोणासाठी वापरली जाईल हे आधी/नंतर विचारा.

2. अशा काळात काही संस्थाही परिस्थितीचा गैरफायदा घेतात. त्यामुळे डोळसपणे संस्था निवडा. मात्र सर्वच संस्था तशा नसतात हे ही ध्यानात घ्या.

3. जुने कपडे देऊच नका, जुने कपडे धुवून वापरणे पूरस्थितीत शक्य नाही. त्यामुळे वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात. ज्या वस्तू तुम्ही स्वतः घरात वापराल त्याच वस्तू द्या.

4. संस्थांनी घरी येऊन मदत न्यावी अशी अपेक्षा करू नका.

लेखक – सचिन आशासुभाष (समाजबंध संस्था)

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Sachin Asha Subhash write on important things while donating to flood affected people

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें