
मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

उत्कृष्ट अभिनय, प्रभावी निवेदन, नृत्यकलेतील प्रावीण्य आणि यशस्वी उद्योजक म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या सौंदर्याने, साधेपणाने आणि अभिनयातील सहजतेने प्राजक्ताने तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे.

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाही प्राजक्ताने आपली वेगळी छाप पाडली आहे.

मात्र, आज वयाच्या 36 व्या वर्षीही प्राजक्ता माळी अविवाहित आहे. मात्र याबाबत ती पूर्णपणे आत्मविश्वासात असून समाजाच्या अपेक्षा किंवा दबावाला ती महत्त्व देत नाही. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने प्रेम आणि नात्यांविषयी अत्यंत परखड आणि विचारपूर्वक मत मांडले आहे.

ती म्हणाली, 'प्रेम हा विषय सगळ्यांनाच आवडतो पण तो तितकाच गुंतागुंतीचाही आहे. जे लगेच, उत्स्फूर्तपणे वाटतं, ते मला प्रेम वाटत नाही. ते केवळ आकर्षण असतं. प्रेम तेव्हाच घडतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक किंवा आत्मिक नातं असतं.'

'अशी एक फिलॉसॉफी आहे की मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार बनतो. जर मागील जन्मातील शत्रुत्व सौम्य असेल तर या जन्मातलं नातंही सौम्य आणि समंजस असतं. माझं वाचन खूप असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच माझ्यासाठी बदलून गेली आहे असं तिने म्हटलं आहे.

तिच्या या विचारांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून अनेकांनी तिच्या या विचारांचे कौतुक केले आहे. प्रेमाकडे केवळ भावनिक नजरेने न पाहता त्यामागील आत्मिक आणि वैचारिक पैलूंवर भर देणारी प्राजक्ताची भूमिका अनेक तरुणांना विचार करायला लावणारी ठरत आहे.