गाणं सुपरहिट, पण थिएटरमध्ये बघताना प्रत्येकजण झाला भावनिक, आजही वेळ काढून ऐकतात लोक
45 वर्षांपूर्वीचं सर्वात रोमँटिक आणि सुपरहिट गाणं, जे बनवण्यासाठी मनोज कुमार यांनी विकलेलं घर आणि जमीन. लता मंगेशकर यांनी दिलेला आवाज. आजही गाणं प्रचंड सुपरहिट.

भारतीय चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघात जुनी झाली तरी त्यांचे महत्त्व आणि लोकप्रियता कधीच कमी होत नाही. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रांती' चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी’ हे असेच एक अजरामर गीत आहे.

तब्बल 45 वर्षांनंतरही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. दिग्दर्शक आणि अभिनेते मनोज कुमार यांनी मोठ्या मेहनतीने आणि धाडसाने 'क्रांती' हा ऐतिहासिक चित्रपट साकारला होता.

हे गाणं चित्रपटात मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून, प्रेम, त्याग, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचा भावनिक संदेश यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

या गाण्याला लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले असून, संतोष आनंद यांनी साधे पण हृदयाला भिडणारे गीतलेखन केले आहे.

आजही लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून सादर केले जाते. नात्यांतील दृढ विश्वास आणि कायम साथ देण्याचा संदेश देणारे हे गाणं आजच्या पिढीलाही तितकेच भावते.