
भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना भारतीय सैन्याने लक्ष्य केलं. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील राज्यांवर ड्रोन हल्ले केले. या तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानची मदत केली.

यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट तुर्कीची मोहीम सुरू झाली. या बहिष्कार मोहिमेबाबत विविध पक्ष, नेते आणि सेलिब्रिटी आपली भूमिका मांडत असतानाच अभिनेता आमिर खानचे काही फोटो चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये आमिरने तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट घेतल्याचं पहायला मिळतंय.

आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील काही दृश्यांची शूटिंग तुर्कीमध्ये पार पडली होती. यावेळी 2020 मध्ये आमिरने तुर्कीयेच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेऊन शूटिंगसाठी परवानगी घेतली होती. त्याचप्रमाणे त्याच्या पाणी फाऊंडेशनच्या कामाचीही माहिती दिली होती.

आमिर खानने 15 ऑगस्ट 2020 रोजी तुर्कियेचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगन यांची पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतली होती. तुर्कीच्या फर्स्ट लेडीने आमिरसोबतच्या या भेटीचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.

आमिरसोबतचे फोटो पोस्ट करत तुर्कीच्या फर्स्ट लेडीने लिहिलं होतं, 'इस्तांबुलमध्ये जगप्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आमिर खानला भेटून खूप आनंद झाला. आमिरने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचं शूटिंग तुर्कीतील विविध ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने मी खूप खुश आहे.'