
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव पुरस्कार 2024' हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यावर्षीच्या 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार.

या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे ही मुलाखत पार पडली. या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणीही ताज्या केल्या.

'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजमध्ये असताना मला अमिताभ बच्चन आवडायचे. नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते," असं अजित पवार म्हणाले.

जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजित दादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्रीदेखील करून दाखवली.

कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा अजित दादांनी पार्थ पवार यांचं नाव घेतलं.