
अमेरिकेत असलेल्या भारतीय वंशाच्या एका वरिष्ठ डॉक्टराचे कुकृत्य समोर आले आहे. या डॉक्टवर फसवणूक करणे, औषधांच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत.

हे आरोप सिद्ध झाल्यास त्याला प्रत्येक गुन्ह्यासाठी साधारण 20-20 वर्षांची शिक्षा तसेच 2.50 लाक डॉलर्स दंड भरावा लागू शकतो. न्यू जर्सीमधील सेकॉकस या भागात हा डॉक्टर राहात असून त्याचे नाव रितेश कालरा असे आहे. या डॉक्टरचे वय 51 वर्षे आहे.

अमेरिकेतील न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता या डॉक्टरला त्याच्या घराची नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दाखल गुन्ह्यानुसार रितेश कालरा हा त्याच्या एअर लॉन क्लिनिकच्या माध्यमातून एक संस्था चालवायचा या संस्थेच्या माध्यमातून हा डॉक्टर कथितरित्या कोणतीही गरज नसताना ऑक्सिकोडोन नावाचे शक्तिशाली ओपिऑईड लिहून द्यायचा.

अनेक डॉक्टरांनी त्याच्यावर गैरवर्तनुक केल्याचाही आरोप केला आहे. कालरा याने आपल्या मेडिकल लायसन्सचा रुग्णावर उपचार करण्यासाठी नव्हे तर नशेच्या आहारी गेलेल्या रुग्णांची शिकार करण्यासाठी केला, असा आरोप केला जातोय.

डॉ. कालरा यांनी आपल्या पदाचा वापर ड्रग्जच्या व्यसनाला प्रोत्साहन देण्यासाठी, असुरक्षित रुग्णांचे लैंगिक शोषण करण्यासाठी केला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्लिनिकच्या माजी कर्मचाऱ्यांनी तसेच रुग्णांनी डॉ. कालरा याच्याविषयी धक्कादायक दावे केले आहेत.

डॉ. कालरा हे औषधांमध्ये ओपिऑईड लिहून देण्याच्या बदल्यात लोकांकडून लैंगिक संबंधाची मागणी करायचे, असे रुग्णांनी सांगितले आहे. तसेच एका महिलेने अनेकवेळा माझे लैंगिक शोषण करण्यात आले, असा दावा केला आहे. दरम्यान, आता या डॉक्टरवर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास त्याला कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.