Archana Puran Singh: युट्यूबच्या कमाईतून अर्चना पुरण सिंहने घेतला कोट्यवधींचा बंगला; मोठं गार्डन, आलिशान बेडरूम अन् खास गॅझेबो..
Archana Puran Singh: अभिनेत्री अर्चना पुरण सिंहने कोट्यवधी रुपयांचा नवीन बंगला खरेदी केला आहे. याची झलक पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. आलिशान बेडरुम, मोठं गार्डन, खास गॅझेबो.. हे सर्व होम टूरमध्ये पहायला मिळालं.

अभिनेत्री आणि लोकप्रिय कॉमेडी शोची परीक्षक अर्चना पूरन सिंह आणि तिचा पती परमीत सेठी यांनी मुंबईतील मड आयलँडमध्ये आणखी एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. नुकताच अर्चना यांनी आपल्या कुटुंबासोबत या नव्या घराचा होम टूर केला.
या घराच्या सुंदर आणि प्रशस्त इंटेरियरची झलक पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे हा बंगला त्यांच्या सध्याच्या घरापासून काही अंतरावरच आहे. अर्चना पूरन सिंह यांच्या नव्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे समोर आलं आहे.
ही नवी प्रॉपर्टी सुमारे 50 कोटी रुपयांची असल्याचं सांगितलं जात आहे. या बंगल्याची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे घरात प्रवेश करताच दिसणारी हिरवाई. घराभोवती मोठ्या प्रमाणात झाडं आणि रोपं लावण्यात आली आहेत.
शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव या घरामुळे मिळतो. घराचा बाहेरील परिसर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अगदी योग्य असल्याचं होम टूरमधून दिसतं.
बंगल्यातील खोल्याही मोठ्या आणि प्रशस्त आहेत. एका खोलीमध्ये स्टोरेजची सुविधा असलेला बेड तसंच पुल-आउट बेड देण्यात आला आहे. त्यामुळे जागेचा स्मार्ट वापर करण्यात आला आहे.
मास्टर बेडरूम तर विशेष मोठी असून, मोठ्या खिडक्यांमधून बाहेरचा सुंदर परिसर पाहता येतो. बंगल्यातील ओपन किचनही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. किचनमध्ये बर्नर आणि चिमणी असून, पांढऱ्या रंगाचा काउंटर, हिरव्या टाइल्स आणि ब्राऊन कॅबिनेट्स असा सुंदर रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे.
या बंगल्याची मोठी बाल्कनीही लक्ष वेधून घेते. याशिवाय घराच्या परिसरात एक सुंदर गॅझेबो आहे. होम टूरनंतर कुटुंबीयांनी याच ठिकाणी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. अर्चना, परमीत, त्यांची मुलं आणि मुलांच्या पार्टनर्ससह संपूर्ण कुटुंब या नव्या घरात एकत्र दिसले.
अर्चना पूरन सिंह यांचं मड आयलँडमधील हे नवं घर केवळ आलिशानच नाही, तर मोठ्या कुटुंबासाठी आरामदायी आणि निसर्गाच्या जवळ जाणारंही आहे. त्यामुळे या नव्या बंगल्याची इनसाइड झलक सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.