
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर टूर्सच्या बुकिंग एकामागोमाग एक रद्द होत असताना, काश्मीरला भेट द्यायला पर्यटक घाबरत असताना अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सर्वांसमोर मोठं उदाहरण सादर केलं आहे. हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर ते खुद्द काश्मीर आणि पहलगामला फिरायला गेले आहेत.

'हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है. हिंदोस्तां की ये जागीर है, के नफ़रत प्यार से हारी है. चलिए जी कश्मीर चलें, सिंधु, झेलम किनार चलें.. मैं आया हूँ , आप भी आएँ,' असं आवाहन त्यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

'सर, काश्मीरमध्ये तुमचं स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली. या कठीण काळात इथं येऊन आम्ही घाबरत नाही हे शत्रूंना दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण एकत्र येऊन यावर मात करूया', असं तिथल्या स्थानिकाने अतुल कुलकर्णींसोबतचे फोटो शेअर करत लिहिलंय.

'पहलगाममधील स्थानिक आपल्यासारखेच धक्क्यात आणि दु:खी आहेत. पण त्याचसोबत तिथले रस्ते, पायवाटा पुन्हा पर्यटकांनी भरतील अशी त्यांना आशा आहे. चलिए जी कश्मीर चलें,' असं अतुल कुलकर्णी यांनी पहलगाममधल्या स्थानिकांची भेट घेतल्यानंतर म्हटलंय.

एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी असायची. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर तिथल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळतोय. असंख्य पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे. तिथे पुन्हा पर्यटनाला चालना मिळावी यासाठी अतुल कुलकर्णींनी हे मोठं आणि तितकंच धाडसी पाऊस उचललं आहे.