
'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने मोठमोठे रेकॉर्ड्ससुद्धा मोडले आहेत. 2025 या वर्षात भारतात प्रदर्शित झालेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत 'अवतार: फायर अँड ॲश' पहिल्या क्रमांकाचा हॉलिवूड चित्रपट बनला आहे.

आता 2026 मध्ये प्रवेश करताना या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. 'अवतार: फायर अँड ॲश' प्रदर्शित होऊन आता 14 दिवस पूर्ण झाले आहेत. चौदाव्या दिवशी या चित्रपटाने 2019 च्या एका मोठ्या हॉलिवूड चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

'अवतार: फायर अँड ॲश'ने पहिल्या आठवड्यात 109.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना आठव्या दिवशी 7.65 कोटी आणि नवव्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई झाली. अकराव्या आणि बाराव्या दिवशी अनुक्रमे 5 आणि 5.25 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं.

2025 च्या शेवटच्या दिवशी 5.25 कोटी रुपये कमाई केल्यानंतर प्रदर्शनाच्या 14 व्या दिवशी या चित्रपटाने 6.9 कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे त्याची एकूण कमाई 160.3 कोटी रुपये इतकी झाली आहे. हा आकडा पुढे आणखी वाढू शकतो.

अवघ्या 14 दिवसांत 'अवतार: फायर अँड ॲश'ने डिस्नेच्या 2019 च्या 'द लायन किंग' या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या आवाजात डब केलेल्या या चित्रपटाने 151.10 कोटी रुपयांची कमाई केली होती.

'सायफाय'च्या मते, जेम्स कॅमरुनच्या 'अवतार: फायर अँड ॲश'ने अवघ्या 13 दिवसांत तब्बल 7400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या मागील दोन्ही भागांनी जगभरात दमदार कमाई केली होती. आता तिसरा भागसुद्धा बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी सुरू ठेवत आहे.