
Vinod Channa : मुंबईमधील एक गरीब व्यक्ती, कधीकाळी चौकीदार म्हणून काम करणारा व्यक्ती मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर किती संपत्ती कमवू शकतो यांचा कोणी अंदाज देखील लावू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो आज प्रत्येक तासाला 25 हजार रुपये कमावतो आहे. ज्याने मुंबईत 6-7 घरे विकत घेतली असून त्याची स्वत:ची 15 कोटींची जीम आहे. कोण आहे हा व्यक्ती?
हे आहेत मुंबईतील दादरच्या एका अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले विनोद चन्ना. त्यांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचा सर्वोच्च शिखर गाठले आहे. चौकीदार म्हणून काम करणारे विनोद आज बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्स तसेच अंबानी आणि बिर्ला कुटुंबाचे फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखले जातात. जॉन अब्राहम, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन रामपाल यांसारख्या नामवंत कलाकारांना त्यांनी फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.
एका मुलाखतीत विनोद चन्ना यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, ‘लहानपणी माझ्याकडे चप्पलची एक जोडीसुद्धा नव्हती. मी दादरमधील अतिशय गरीब भागात वाढलो. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासमोर ट्रेनर म्हणून उभा राहीन असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.
विनोद यांना लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी फिटनेस क्षेत्रात पाऊल टाकले. सेलिब्रिटी ट्रेनर होण्याआधी त्यांनी तब्बल 15 वर्षे बॉडीबिल्डिंगमध्ये मेहनत घेतली. मुंबईतील एका जिममध्ये त्यांनी ट्रेनर म्हणून करिअरची सुरुवात केली आणि जवळपास 12 वर्षे त्या जिममध्ये काम केले. मात्र अधिक चांगली फी आणि मोठ्या क्लायंट्ससाठी त्यांनी तो जिम सोडून बांद्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
बांद्रामध्ये सुरुवातीला त्यांच्याकडे एकही क्लायंट नव्हता. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. जिममध्ये जो कोणी भेटेल, त्याला त्यांनी ट्रेनिंग दिलं असे त्यांनी सांगितलं. याच दरम्यान रितेश देशमुख यांच्या एका नातेवाइकाने विनोद यांचे काम पाहिले आणि त्यांची शिफारस केली. याच क्षणापासून त्यांच्या सेलिब्रिटी ट्रेनर प्रवासाला खरी सुरुवात झाली.
फिल्म ‘फोर्स’ साठी जॉन अब्राहम यांना ट्रेनिंग देताना विनोद त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते. त्या काळात ते तासाला 25 हजार रुपये फी घेत होते आणि दिवसाला 16 तास काम करत होते. याच काळात अनन्या बिर्ला यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक मानधन दिले. आज विनोद चन्ना दररोज 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. त्यांनी ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांनाही फिटनेस ट्रेनिंग दिली आहे.