100 एकरचा फार्महाऊस, 99 घरांचा मालक, 200 कर्मचारी.. घोडे-बोटीने पोहोचतो घरी; कोण आहे हा बॉलिवूड गायक?
या प्रसिद्ध गायकाने नुकत्याच एका व्लॉगमध्ये त्याच्या फार्महाऊस आणि इतर संपत्तीविषयी माहिती दिली आहे. शंभर एकर परिसरात पसरलेल्या या फार्महाऊसवर तब्बल 200 कर्मचारी असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मीका सिंह केवळ त्याच्या दमदार आवाजासाठीच नव्हे, तर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही चर्चेत असतो. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, मीका सिंहकडे तब्बल 99 घरं आणि सुमारे 100 एकरमध्ये पसरलेलं भव्य फार्महाऊस आहे.
विशेष म्हणजे या फार्महाऊसमध्ये पोहोचण्यासाठी विमान, कार, बोट आणि घोड्याचा वापर करण्याची वेळ येते. मीकाच्या संपत्तीची आणि फार्महाऊसची ही माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मीकाने एका मुलाखतीत आपल्या फार्महाऊसबाबतचा प्रवास सांगितला. सुरुवातीला त्याने केवळ दोन एकर जमीन खरेदी केली होती. त्या वेळी हा परिसर जवळपास जंगलासारखा होता. मीका अधूनमधून तिथे जाऊन आराम करायचा, स्वतः जेवण बनवायचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात तंबूत राहायचा.
त्यानंतर त्याने हळूहळू आजूबाजूची जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आणि या जागेचा विस्तार करत तब्बल शंभर एकरांचं फार्महाऊस उभं केलं. आज या परिसराच्या आसपास अनेक हॉटेल्सही उभी राहिली आहेत.
मीकाच्या फार्महाऊसची खासियत म्हणजे तिथे पोहोचण्याचा अनुभवच वेगळा आहे. विमानाने प्रवास केल्यानंतर कार, त्यानंतर बोट आणि काही वेळा घोड्यावरूनही फार्महाऊसपर्यंत जावं लागतं. आपल्या श्रीमंत मित्रांकडे महागड्या गाड्या आहेत, पण घोडे आणि बोट नाहीत, असं सांगत मीकाने याबाबत मिश्कील किस्साही सांगितला.
मीका सिंहने 99 घरं असल्याचाही खुलासा केला आहे. मात्र आपल्या आजच्या यशाकडे पाहताना त्याने संघर्षाचे दिवसही आठवले. एकेकाळी पाच भावंडांसोबत एका बेडरूमच्या घरात राहत असल्याचं त्याने सांगितलं. त्या काळातही मी समाधानी होतो आणि कोणाकडेही तक्रार केली नाही, असं मीकाने म्हटलं आहे.
मीकाच्या या भव्य फार्महाऊसमध्ये केवळ आलिशान घरच नाही, तर घोडे, उंट, ट्रॅक्टर, शेती आणि हेलिपॅडसारख्या अनेक सुविधा आहेत. तिथे मोहरीची शेती, विविध भाज्या आणि फळांचं उत्पादनही केलं जातं. याशिवाय खासगी स्टुडिओ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी जागाही आहे.
फार्महाऊसमध्ये मंदिर आणि गुरुद्वाराही असून तिथे नियमित धार्मिक प्रार्थना आणि पाठ सुरू असतात. इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी मोठी टीमही कार्यरत आहे. त्याच्या 99 प्रॉपर्टीपैकी प्रत्येक ठिकाणी देखभालीसाठी कर्मचारी असतात.
फार्महाऊसवर दिवसभर सुमारे 200 लोक काम करतात, तर काही कर्मचारी तिथेच मुक्काम करतात. साध्या सुरुवातीपासून इतक्या मोठ्या संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सध्या चर्चेत आला आहे.