
मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये आज सकाळपासूनच प्रचंड तणावाचे वातावरण आहे. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर, वन विभागाने येथील बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

काल झालेल्या हिंसक संघर्षानंतर आज प्रशासनाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. या कारवाईची ठिणगी काल पडली. वन विभागाचे कर्मचारी आणि जवान आदिवासी पाड्यांमध्ये बेकायदेशीर बांधकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते.

सर्वेक्षणादरम्यान संतप्त झालेल्या काही रहिवाशांनी वन विभागाच्या पथकावर जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात वन विभागाच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले.

या घटनेमुळे वन विभागाने आजची कारवाई अधिक मोठ्या तयारीने करण्याचा निर्णय घेतला. आजची कारवाई शांततेत पार पाडण्यासाठी वन विभाग आणि मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.

यावेळी घटनास्थळी डीसीपी (झोन १२) आणि वरिष्ठ वन अधिकारी स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. आदिवासी पाड्यांमधील अरुंद वाटा आणि डोंगराळ भागाचा विचार करता, कोठूनही दगडफेक किंवा विरोध होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी चार ते पाच बुलडोझर (JCB) पाचारण केले आहेत. ही यंत्रे आदिवासी पाड्यांत दाखल झाली आहे.

यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांनी कडेकोट वेढा घातल्यामुळे सध्या पाडकाम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील वाढती अतिक्रमणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.