
ड्रोनद्वारे एकावेळी 20 किलो पार्सल घेऊन जाण्याची व्यवस्था असलेली ड्रोन सर्विसची चाचणी माथेरान मध्ये घेण्यात आली. ड्रोन सर्विसची चाचणी यशस्वी झाली असून भविष्यात माथेरान येथे पोस्टाचं पार्सल ड्रोन द्वारे येण्यास सुरुवात होणार आहे.

माथेरान हे ठिकाणी मुंबई पासून हवाई अंतराने काही मिनिटांवर आहे, मात्र रस्ते मार्गाने काही तासांचे आहे. त्यामुळे 800 मीटर उंचावर असलेल्या माथेरानमध्ये पोस्टाकडून ड्रोन सेवा देण्याचा विचार सुरु आहे. त्यानुसार ड्रोन माथेरानमध्ये उंच उडून किती किलो वजन पेलू शकतं याची चाचणी दूर संचार विभाग यांच्याकडून घेण्यात आली.

चाचणीमध्ये कर्जतमधून पोस्ट कार्यालयाच्या इमारतीवरून ड्रोन उडविण्यात आलं. अवघ्या 15 मिनिटांत हे ड्रोन माथेरानमध्ये पोहचलं. यापूर्वी कर्जत माथेरान अंतरासाठी दीड तासांचा वेळ लागत होता. पण ड्रोनच्या मदतीने कमी वेळ लागणार आहे. ड्रोन मधून एखदी वस्तू आणण्यासाठी फक्त 15 मिनिटं लागतील.

माथेरान येथे पोस्ट कार्यालयाच्या समोर फन टाइम रेस्टोरंट समोरून ड्रोन उडविण्यात आले. त्यावेळी साधारण 9 किलो 800 ग्रॅम वजन असलेली पार्सल माथेरान येथून कर्जत पाठवण्यात आली. सर्व पार्सल अवघ्या १५ मिनिटात कर्जत पोस्ट कार्यालयात पोहचली.

त्यामुळे ड्रोन चाचणी यशस्वी झाली असून माथेरानमध्ये चाचणी नंतर दूरसंचार निगमकडून जल्लोष करण्यात आला. या चाचणी नंतर माथेरान मध्ये हायटेक स्वरूपात पोस्टाची पार्सल येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

ड्रोन चाचणी यशस्वी ठरली आहे, पण भविष्यात माथेरान येथे कर्जत येथून की अन्य कोणत्या शहरातून ड्रोनच्या माध्यमातून पार्सल आणली जातील यावर अद्याप कोणतीही माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आली नाही.