
मुंबईची शान, महाराष्ट्राची जान आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारा एकमेव पदार्थ म्हणजे वडापाव. सकाळी ऑफिसला जाताना, दुपारी भूक लागल्यावर किंवा संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारताना सहजच एक दोन वडापाव मिटक्या मारत खाल्ले जातात.

भूक लागल्यानंतर किंवा पार्टी म्हटलं की आपल्या सर्वांना वडापाव आठवतो. गरमागरम वडा, मऊशार पाव आणि त्यावर तिखट-गोड चटणी... ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना?

पण तुम्ही एका महिन्यात किती वडापाव खाऊ शकता याबद्दल कधी विचार केलात का? किंवा जर तुम्हीही एक महिनाभर दररोज वडापाव खाल्लात, तर काय होऊ शकते? नाही ना, मग आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

वडापाव हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. धावपळीच्या जीवनात अनेक लोकांची भूक भागवणारा हा पदार्थ चवीला उत्तम असला तरी रोज त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही एक महिना सलग वडापाव खाल्लात तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

बटाटावडामध्ये प्रामुख्याने बटाटा, बेसन, तळण्यासाठी वापरण्यात येणार तेल असते. तर पाव बनवताना मैद्याचा वापर केला जातो. वडापाव तळण्यासाठी वापरले जाणारे तेल अनेकदा पुन्हा पुन्हा वापरले जाते, ज्यामुळे त्यात ट्रान्स फॅटी ॲसिड तयार होतात. हे ट्रान्स फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

वडापावमधील पाव मैद्यापासून बनवला जातो. मैद्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही, कारण त्यामुळे सुस्ती येते. तसेच पचनसंस्थेशी संबंधित विविध विकार होऊ शकतात. त्यासोबतच वड्यामध्ये बटाटा असतो, जे साधे कर्बोदके आहेत, पण याच्या अतिसेवनाने वजन वाढते. वडापावमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. पण प्रोटिन्सचे प्रमाण तुलनेने कमी असते.

जर तुम्ही एक महिना सलग वडापाव खाल्लात तर तुम्हाला पहिल्या आठवड्यात सुस्ती आल्यासारखे, दम लागल्यासारखे वाटेल. यानंतर पुढच्या आठवड्यात तुम्हाला थोडं वजन वाढल्यासारखे वाटेल.

यानंतर तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तर चौथ्या आठवड्यात तुमचे कोलेस्ट्रॉल, शुगर लेव्हल वाढू शकते. हे सगळे परिणाम तुम्ही खात असलेल्या वडापावमधील अतिरिक्त कॅलरीज, फॅट्स आणि मैद्यामुळे होतात.

ज्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी वडापाव खाऊ नये. तसेच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी तळलेले पदार्थ टाळावेत. त्यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांनी वडापावचे सेवन टाळावे, कारण त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते.

यासोबतच किडनीच्या विकारांनी ग्रस्त असलेल्यांनी आणि ज्यांचे काम बैठे आहे, जे शारीरिक हालचाल कमी करतात, त्यांनी वडापाव खाणे टाळावे. कारण त्यामुळे वजन वाढण्याचा धोका जास्त असतो.

याचा अर्थ असा नाही तुम्ही वडापाव खाऊ नका असे नाही. जर तुमची जीवनशैली निरोगी असेल आणि तुम्हाला कोणताही आजार नसेल, तर तुम्ही महिन्यातून एकदा वडापाव खाऊ शकता. पण हा वडापाव शक्यतो घरी बनवून खा.

कारण घरात बनवलेला वडापाव ताजे तेल वापरून बनवला जातो. त्यामुळे तो तुलनेने चांगला असतो. वडापाव चविष्ट असला तरी त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आरोग्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे.