
भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप घेऊन येणार आहे. येत्या दिवाळापूर्वीच नवीन मोबाइल ॲप ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.

EPFO 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल अथवा थेट एटीएम मशीनमधून ईपीएफओच्या एटीएम कार्डच्या मदतीने रक्कम काढता येईल.

कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबर रोजी बैठक होत आहे. दिवाळीपूर्वीच देशातील 8 कोटी ईपीएफओ सदस्यांना सुखद धक्का देण्याची सरकारची योजना आहे. त्यांना आता केव्हाही त्यांची पीएफ रक्कम काढता येईल.

या बैठकीत EPFO बोर्ड किमान सेवा निवृत्ती वेतन 1000 रुपयांहून 1,500-2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

नवीन प्रक्रियेत EPFO सदस्यांना एक विशेष ATM कार्ड देईल. हे एटीएम कार्ड PF खात्याशी लिंक असेल. या कार्डचा वापर करून थेट पीएफ रक्कम काढता येईल. ईपीएफओने मान्यता दिलेल्या एटीएममधूनच ही रक्कम निघेल. त्यासाठी EPFO युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (UAN) जोडलेल्या कार्डचा वापर करावा लागेल.

UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल. EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून लागलीच पीएफ रक्कम काढू शकतील.

EPFO 3.0 आल्यानंतर पीएफची किती रक्कम काढता येईल याविषयी अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार एकूण रक्कमेच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. तर UPI च्या माध्यमातून किती रक्कम काढता येईल याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.