
गेल्या महिनाभरापासून आभाळातून कोसळधार सुरू आहे. राज्यातील कित्येक गावात मुसळधार पाऊस झाला आहे. काही गावात ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडवली आहे. शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे.

हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावला आहे. मोठी मशागत करून शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन आणि इतर पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं.

सुरुवातीला काही दिवस लपंडाव खेळणाऱ्या पावसाने नंतर जोरदार मुसंडी मारली. शेतात तळे साचले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक ठिकाणी जमिनी खरडून वाहून गेल्या. जनावरं वाहून गेली. माणसं वाहून गेली. पिकं हातीची गेली.

यवतमाळच्या आर्णी येथील शेतकरी सैय्यद रहीम यांच्या मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न आहे. पावसामुळे त्याच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्याचा आक्रोश दिसून आला. शेतकरी ढसा ढस रडला. त्याच्या रडण्याने अनेकांची मनं हादरून गेली.

सय्यद यांनी पाच एकरात सोयाबीन पेरलं होतं. मात्र अतिवृष्टी मुळे सोयाबीनचं पीक पूर्ण मातीमोल झालं.

त्यामुळे वयात आलेल्या मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न कसं करावं असा प्रश्न शेतकरी सैय्यद रहीम यांना सतावत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने शेतात आक्रोश करून टाहो फोडला.