
हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास वाढतो. या वेदनांचा परिणाम सांध्यावर सर्वाधिक दिसून येतो. अनुवांशिकता, अशक्तपणा, शिळं आणि थंड अन्न खाणं अथवा यूरिक ॲसिड जमा झाल्याने असा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात वातावरणातील दाब कमी होतो आणि अशा परिस्थितीत सांधे व शरीराच्या इतर भागांना सूज येऊ लागते. थंडीत अंगदुखीचा त्रास टाळायचा असेल तर हे उपाय करून पहा.

वजन ठेवा नियंत्रणात - असं म्हणतात की हिवाळ्यातील खाण्या-पिण्यामुळे शरीराच्या विकासास जास्त मदत होते. मात्र अयोग्य पद्धतीने वजन वाढल्यास शरीरातील सांध्यामध्ये वेदना सुरू होई शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

हॉट शॉवर - तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी दररोज गरम शॉवर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात निर्माण झालेला दाबही कमी होऊ लागतो.

दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्या - पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असते. पाणी हे शरीरासाठी रामबाण उपाय आहे. थंडी असो किंवा उन्हाळा दररोज पुरेशा प्रमाणात पाणाी प्यायले पाहिजे. मात्र हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होत असेल तर रोज कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक ठरते.

आहाराची घ्या काळजी - आपण काय खातो, यावर आपले आरोग्य चांगले राहील की नाही, हे अवलंबून असते. बाहेरचे पदार्थ तसेच जंक फूड खाणे टाळावे आणि घरात शिजवलेले , पौष्टिक अन्न खावे. आहारात डाळी, हिरव्या भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश केला पाहिजे.