
भारतात रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट काढणे अनिवार्य असते, अन्यथा दंड भरावा लागतो. परंतु, आपल्या देशात एक अशीही रेल्वे आहे जिने गेल्या ७५ वर्षांत एकाही प्रवाशाकडून एक पैसाही आकारलेला नाही. ही कोणतीही तांत्रिक चूक किंवा तात्पुरती सवलत नसून एक जाणीवपूर्वक घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.

या मोफत रेल्वे सेवेची सुरुवात १९४८ मध्ये झाली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाक्रा नांगल धरणाचे काम सुरू झाले, तेव्हा कामगार, अभियंते आणि अवजड यंत्रसामग्री नेण्यासाठी या विशेष रेल्वेची निर्मिती करण्यात आली होती.

धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही रेल्वे या भागाची जीवनवाहिनी बनली होती. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा बंद न करता भाक्रा बियास मॅनेजमेंट बोर्डाने (BBMB) ती तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

यामागील मुख्य उद्देश म्हणजे भाक्रा धरणा परिसरातील पर्यटनाला चालना देणे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी, यासाठी ही ट्रेन आजही विनामूल्य चालवली जाते. नांगल ते भाक्रा दरम्यान सुमारे १३ किलोमीटर धावणारी ही ट्रेन आजही डिझेल इंजिन आणि जुन्या लाकडी डब्यांसह आपला वारसा जपून आहे.

याचा सर्वाधिक फायदा बीबीएमबी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी, शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी मोफत प्रवास आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून होतो.

विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेप्रमाणे या ट्रेनला तिकिटातून उत्पन्न मिळत नाही. या रेल्वेचा संपूर्ण खर्च भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ स्वतः उचलते. ते या रेल्वेला केवळ एक वाहतुकीचे साधन न मानता महत्त्वाची सार्वजनिक सुविधा मानतात.

तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारी ही ट्रेन केवळ लोखंडी रुळांवर धावणारी गाडी नसून, ती आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि जनसेवेच्या निस्वार्थ भावनेची जिवंत साक्ष आहे.

जर तुम्हालाही विनातिकीट कायदेशीर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि ऐतिहासिक भाक्रा धरणाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर या अनोख्या रेल्वेचा प्रवास नक्कीच करायला हवा.