एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री, हृतिक, रणबीर, रणवीरची बनली हिरॉईन; ओळखलं का ?
नॉन-फिल्मी कुटुंबातून येऊन तिने स्वतःच्या मेहनतीने मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केली. हॉटेल उद्योगातून मॉडेलिंग आणि नंतर यशराज फिल्म्सच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हृतिक, रणबीर, रणवीरसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का ?

Vaani Kapoor Birthday : बॉलिवूडमध्ये अनेक नामवंत अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याने, अदाकारींनी आणि त्यांच्या अभिनयाने आज खूप यशस्वी ठरल्यात. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक नावाजलेली आणि सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. तिचे असंख्य चाहते आहेत. . मॉडेलिंगपासून सुरू झालेला तिचा प्रवास आता मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम करण्यापर्यंत पोहोचला आहे. 13 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या वाणीने आत्तापर्यंत अक्षय कुमार, अजय देवगण, रणबीर कपूर, रणवीर सिंग, हृतिक रोशन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. वाणीचा आज वाढदिवस, जाणून घेऊया तिचा प्रवास.. ( All Photos : Social Media / Instagram)
वाणी कपूरचा जन्म 23 ऑगस्ट 1987 रोजी नवी दिल्ली येथे झाला. चित्रपट क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या कुटुंबातून आलेल्या वाणीने स्वतःच्या मेहनतीने मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वाणीने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केले. तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली, तर मुंबईतील आयटीसी हॉटेलमध्येही नोकरी केली. हॉटेलमध्ये काम करत असताना वाणीची भेट एका मॉडेल मॅनेजमेंट एजन्सीशी झाली. तिची उंची आणि सौंदर्य पाहून तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली आणि तिच्या करिअरला नवे वळण मिळाले.
मॉडेलिंगच्या काळात वाणीने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी काम केलं. विविध जाहिरातींमध्ये झळकल्यानंतर तिच्याकडे यशराज फिल्म्सचे लक्ष गेलं. 2013 मध्ये वाणीने ‘शुद्ध देसी रोमांस’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रासोबत झळकली.
2014 मध्ये वाणीने ‘आहा कल्याणम’ या चित्रपटातून दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. हा चित्रपट रणवीर सिंहच्या ‘बँड बाजा बारात’चा तमिळ रिमेक होता. वाणीने अक्षय कुमारसोबत ‘बेल बॉटम’ आणि ‘खेल खेल में’ या दोन चित्रपटांमध्ये काम केले. दोन्ही चित्रपटांत तिने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली. ‘रेड 2’मध्ये वाणीने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका केली. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
वाणी आणि रणवीर सिंहची जोडी 2016 मधील ‘बेफिक्रे’मध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटामुळे दोघांची जोडी चांगलीच चर्चेत आली. 2019 मधील ब्लॉकबस्टर ‘वॉर’मध्ये वाणीने ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत काम केलं. या चित्रपटाने तिच्या करिअरला आणखी मोठी ओळख मिळवून दिली.
‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘बेफिक्रे’, ‘वॉर’, ‘बेल बॉटम’, ‘चंदीगड करे आशिकी’, ‘शमशेरा’, ‘खेल खेल में’ आणि ‘रेड 2’ अशा चित्रपटांमधून वाणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.