
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय सार्वजनिक केला आहे.

दरम्यान, त्याचा या निर्णयानंतर क्रिकेट विश्वातील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक तथा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीदेखील विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.

विराट आणि गौतम गंभीर हे दोघेही क्रिकेटच्या मैदानात अनेकदा आमनेसामने आलेले आहेत. हे दोघेही एकमेकांवर उघडपणे राग-राग करताना दिसलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी इतर खेळाडूंना मध्यस्था करावी लागलेली आहे.

दरम्यान, विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर गौतम गंभीर यांनी एक्स या सोशल मीडियावर दोन ओळींची प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी आपल्या एक्स खात्यावर विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच सिंहासारखी महत्त्वाकांक्षा असणारा माणूस...आम्हाला तुझी आठवण येत राहील चिक्स... असं गौतम गंभीर म्हणाला आहे.

विराट कोहलीचे बालपणीचे नाव चिकू असे आहे. याच नावाला आणखी छोटे करून गौतम गंभीर यांनी विराटला चिक्स असे म्हटले आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची मैदानावर अनेकदा भांडणं झाली असली तरी नंतरच्या काळात त्यांच्यातील संबंध चांगले सुरळीत झाले होते. आता गौतम गंभीरनेही सर्व जुने वाद विसरून विराट कोहलीला त्याच्या आगामी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.