
अनेकदा लोक मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करतात, मात्र घरात जास्त दिवस राहिल्यास बटाट्याला मोड येतात. असे अंकुरलेले बटाटे खाणे सुरक्षित आहे का?

बटाट्यांमध्ये सोलानाइन आणि चाकोनाइन नावाची दोन नैसर्गिक रसायने (ग्लायकोआल्कॅलॉइड्स) असतात. कमी प्रमाणात, हे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र बटाट्यांमध्ये मोड आल्याने सोलानाइन आणि चाकोनाइनचे प्रमाण वाढते. त्यामुळे असे बटाटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

मोड आलेले बटाटे खाल्ल्याने उलट्या, अतिसार किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच कमी रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, ताप, डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते. गर्भवती महिलांसाठी हे विशेषतः धोकादायक असू शकते.

बटाट्याची पाने, फुले, साल आणि मोडांमध्ये जास्त हानिकारक पदार्थ असतात. जर बटाटा हिरवा झाला असेल, फुटला असेल किंवा त्याची चव कडू असेल तर हे पदार्थ त्यात जास्त असू शकतात.

बटाटे उकडल्याने किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने हा धोका कमी होत नाही. तसेच बटाच्याचा मोड आलेला भाग किंवा हिरवा भाग आणि खराब झालेले भाग कापून टाकला तरी धोका कमी होत नाही. त्यामुळे असे बटाटे खाणे टाळावे.