21 वर्षे केली सरकारी नोकरी अन् इंडस्ट्रीत ठेवलं पाऊल, बनला सर्वात खतरनाक खलनायक, जो अभिनेत्यापेक्षा घेयचा जास्त मानधन
21 वर्षे केली सरकारी नोकरी आणि अभिनय क्षेत्रात येऊन बनला बॉलिवूडचा सर्वात खतरनाक खलनायक. जो चित्रपटातील अभिनेत्यापेक्षा घेयचा सर्वात जास्त मानधन.

बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली आणि दमदार खलनायकांपैकी एक असलेले अमरीश पुरी हे सर्वात खतरनाक खलनायकांपैकी एक आहेत. त्यांच्या भारदस्त आवाजाने, तीक्ष्ण नजरेने आणि दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. 'मोगॅम्बो खुश हुआ' हा त्यांचा संवाद आजही चाहत्यांच्या स्मरणात ताजा आहे.

अनेकांना माहिती नाही की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अमरीश पुरी यांनी तब्बल 21 वर्षे कर्मचारी विमा निगममध्ये क्लर्क म्हणून काम केले होते. सरकारी नोकरी सांभाळत असतानाच ते पृथ्वी थिएटरमध्ये नाटकांमध्ये काम करत होते. अभिनयाची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी अखेर सुरक्षित नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

मुंबईत आल्यानंतर त्यांना पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्ये नकार मिळाला. त्यांचा चेहरा नायकासारखा नसल्याचे सांगत त्यांना रिजेक्ट करण्यात आले. मात्र त्यांनी हार मानली नाही. रंगभूमीवरील काम सुरू ठेवत त्यांनी अभिनयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

1967 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तर 'प्रेम पुजारी' 1970 या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पुढील 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे खलनायक ठरले होते. एका चित्रपटासाठी ते तब्बल 1 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते, जे त्या काळात अनेक नायकांपेक्षाही अधिक होते.