चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर…
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे दातांचे आरोग्य बिघडण्यासोबतच पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. चहा आणि पाणी यामध्ये नेमके किती अंतर असावे आणि तज्ज्ञांचे मत काय आहे, याची सविस्तर बातमी वाचा.

भारतीयांचे चहावरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकदा चहाचा आस्वाद घेताना दिसतात. मात्र, चहा पिण्याबाबत आपल्याकडे अनेक सवयी पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिणे.

अनेकदा वडीलधारी मंडळी चहावर पाणी पिण्यास मनाई करतात. पण त्यामागची ठोस कारण सांगत नाही. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.

चहा गरम असतो आणि पाणी थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. जेव्हा आपण गरम चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पितो, तेव्हा दातांच्या तापमानात अचानक बदल होतो. यामुळे दातांवरील संरक्षणात्मक थर म्हणजेच इनॅमल कमकुवत होते. परिणामी दात शिवशिवणे (Sensitivity) आणि हिरड्यांमधून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रसांची तीव्रता कमी होते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच ॲसिडिटी, गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या तक्रारी सुरू होतात.

गरम चहा आणि थंड पाणी यांच्यातील तापमानाचा मोठा फरक पोटाच्या संवेदनशील अस्तरांना इजा पोहोचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ ही सवय राहिल्यास पोटाचा अल्सर होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या तापमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे रोगप्रतिकार शक्तीवर ताण येतो. यामुळे थंड-गरम होऊन घसा बसणे, घसा खवखवणे किंवा अचानक सर्दी होण्याचे प्रमाण वाढते.

चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटांनी पाणी प्यावे. जेणेकरून शरीराचे तापमान सामान्य होईल. चहा पिण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे चहामधील ॲसिडचा परिणाम कमी होतो.