
आजकाल सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहे. तळहातात मावणाऱ्या या फोनमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. बँकिंगपासून ते बातम्यांपर्यंत सगळं काही तुम्हाला एका क्लिकवर करता येतं. तुमचा हाच फोन मात्र एखाद्या व्यक्तीने चोरी केला तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

अशा स्थितीत पोलीस तुमच्या मदतीला येऊ शकतात. पोलीस तुमच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करून तुम्हाला फोन शोधून देऊ शकतात. पोलिसांनी आतापर्यंत चोरी गेलेले हजारो फोन परत मिळवलेले आहेत. पोलीस फोनचे लोकेशन कसे ट्रॅक करतात हे जाणून घेऊ या..

प्रत्येक स्मार्टफोनचा एक यूनिक आयडी नंबर असतो. त्याला आयएमईआय नंबर म्हटले जाते. याच नंबरच्या मदतीने मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले जाते. मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीमकार्डला कोणत्या टॉवरकडून सिग्नल मिळत आहे, यावरूनही मोबाईलचे लोकेशन शोधले जाते.

फोनमध्ये इनबिल्ट ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) असते. ही सिस्टिम सक्रीय असेल तर तुमच्या फोनचे लोकेशन शोधता येते. फोनमध्ये गुगल अकाऊंट लॉगीन असेल तर गुगल अकाऊंटच्या लोकेशन हिस्ट्रीवरूनही फोनचे लोकेशन शोधता येते.

पोलीस कधीकधी तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल असलेले अॅप्स, सोशल मीडिया अॅप्स यांच्या मदतीनेही मोबाईलचे लोकेशन शोधतात. फोनमधील कॉल आणि मेसेजच्या माध्यमातूनही तुमच्या फोनचे लोकेशन शोधून काढतात.