
प्रेशर कुकर हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य साधन आहे. डाळ असो वा भात, कुकरशिवाय करणं म्हणजे खूप कठीण काम असते. पण अनेकदा ऐनवेळी कुकरचा रबर सैल होतो आणि वाफ बाहेर पडू लागल्यामुळे शिट्टी वाजत नाही. अशावेळी जेवण वेळेवर शिजत नाही आणि गॅसचीही मोठी नासाडी होते.

जर तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर नवीन रबर विकत आणण्यापूर्वी काही घरगुती उपाय नक्की करून पहा. कुकरचा रबर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असल्याने त्याची लवचिकता हळूहळू कमी होते. अन्नाचे कण किंवा तेलाचा चिकटपणा साचल्यामुळे रबर झाकणावर नीट पकड घेऊ शकत नाही. परिणामी, तो ताणला जातो किंवा आकुंचन पावण्याची क्षमता गमावतो.

बर्फाच्या पाण्याचा वापर : हा सर्वात जलद आणि खात्रीशीर उपाय आहे. यासाठी तुम्ही प्रथम कुकरच्या झाकणातून रबर काढा. तो साबणाने स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील चिकटपणा निघून जाईल.

एका भांड्यात कडक थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी घ्या. त्या पाण्यात रबर पूर्णपणे बुडवून १० ते १५ मिनिटे ठेवा. थंडीमुळे रबर आकुंचन पावतात आणि रबर पुन्हा मूळ आकारात येण्यास मदत होते.

जर तुम्हाला तातडीने कुकर लावायचा नसेल, तर रबर धुवून कोरडा करा आणि १०-२० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे रबर घट्ट होतो आणि झाकणावर व्यवस्थित बसतो.

जर रबर जास्तच जुना झाला असेल आणि वरील उपायांनीही थोडी वाफ जात असेल, तर झाकणाच्या कडांना ओल्या पिठाचा थर लावा. हे तात्पुरत्या स्वरुपात काम करते आणि प्रेशर टिकवून धरते.

प्रत्येक वापरा नंतर रबर काढून स्वच्छ धुवावा. अन्नाचे कण साचल्याने तो लवकर खराब होतो. रबरची लवचिकता टिकवण्यासाठी त्याला अधूनमधून थोडे खाद्यतेल लावून ठेवावे. रबर कधीही थेट सूर्यप्रकाशात किंवा गॅसच्या शेजारी ठेवू नका, कारण अतिउष्णतेमुळे तो लवकर सैल पडतो.

जर रबरला कोठे छेद गेला असेल किंवा तो कापला गेला असेल, तर तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. अशा परिस्थितीत सुरक्षिततेसाठी नवीन रबर घेणेच हिताचे ठरते.