
सध्या राज्यात ठिकठिकाणी थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मफलर, टोपीचा वापर करणं सुरु केले आहे. हिवाळ्याचा कडाका वाढताच अनेकांनी लोकरीचे कपडे कपाटातून बाहेर काढले आहे.

स्वेटर, कोट, मफलर आणि कानटोपी हे केवळ थंडीपासून संरक्षण करत नाहीत, तर तुमचा लूकही आकर्षक बनवतात. मात्र, लोकरीचे तंतू अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते.

अनेक लोक रोजच्या कपड्यांप्रमाणेच गरम कपडे धुतात, ज्यामुळे ते लवकर जुने होतात. काही वेळा ते आकसतात, ताणले जातात किंवा त्यांना गाठी येतात. तुमच्या आवडत्या स्वेटरचा मऊपणा आणि रंग दीर्घकाळ टिकावा यासाठी कपडे धुताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि त्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

लोकरीचे कपडे धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्यामुळे लोकरीचे तंतू खराब होतात आणि ते एकमेकांना घट्ट धरतात, ज्यामुळे कापड आकसतात आणि स्वेटरचा मूळ आकार बिघडतो. लोकरीचे कपडे धुताना नेहमी थंड किंवा जास्तीत जास्त कोमट पाणी वापरा. यामुळे लोकरीचा मऊपणा आणि आकार टिकून राहतो.

सामान्य कपड्यांसाठी वापरले जाणारे डिटर्जंट लोकरीसाठी वापरू नका. कडक डिटर्जंट्समुळे लोकरीची नैसर्गिक चमक कमी होते. त्यामुळे कपडे निस्तेज आणि खडबडीत होतात. गरम कपड्यांसाठी नेहमी सौम्य लिक्विड डिटर्जंट किंवा खास लोकरीसाठी बनवलेले साबण वापरा. यामुळे रंगाची आणि धाग्यांची चमक टिकून राहते.

गरम कपडे घासण्यासाठी ब्रशचा वापर करणे किंवा हाताने जोरजोरात चोळणे टाळा. जोर लावून घासल्यास तंतू तुटतात आणि विस्कटतात. ज्यामुळे कपड्यांवर लोकरीच्या गाठी तयार होतात आणि स्वेटर जुना दिसतो. कपडे केवळ पाण्यात बुडवून ठेवा. त्याला हलक्या हाताने दाबा.

धुतल्यानंतर त्यातील पाणी काढताना ते पिळू नका; फक्त हलके दाबून पाणी काढून टाका. कपडे लवकर सुकावेत म्हणून त्यांना वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये किंवा कडक उन्हात सुकवू नका. ड्रायरची गरम हवा आणि तीव्र गती कपड्यांना ताणते.

तसेच कडक उन्हामुळे त्याचा रंग फिका पडतो. गरम कपडे नेहमी सपाट पृष्ठभागावर ठेवून सावलीत वाळवा. यामुळे त्यांचा आकार बिघडत नाही आणि ते सुरक्षित राहतात. वॉशिंग मशीन वापरत लोकरीचे कपडे धुत असाल तर Wool किंवा Delicate हा पर्याय निवडा. जर स्वेटरवर गाठी आल्या असतील, तर त्या काढण्यासाठी बाजारात मिळणारे लिंट रिमूव्हर वापरा. यामुळे कपड्यांना इजा न होता गाठी निघून जातात.