तुकाराम मुंढेंना आईच्या हातचा ‘हा’ पदार्थ सर्वात जास्त आवडतो, नाव ऐकून तुम्ही म्हणाल…
सध्या तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. अशातच तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याचा खुलासा केला आहे.

महाराष्ट्रातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे ते सातत्याने चर्चेत आहेत.

कारवाईच्या धडाक्यामुळे नेहमी चर्चेत असणारे तुकाराम मुंढे नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींबद्दल बोलले. यावेळी त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारण्यात आले. त्यावर कोणता एक पदार्थ आवडतो हे सांगणं अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं.

मात्र, आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी आईच्या हातच्या मसाला वडी अर्थात मासवडीचा खास उल्लेख केला. मराठवाड्यात हा पदार्थ अनेकांना परिचित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईच्या हातच्या या पारंपरिक पदार्थाची आठवण सांगताना मुंढे यांच्या बोलण्यातून त्यांचं मराठी खाद्यसंस्कृतीशी असलेलं नातंही दिसून आलं. याशिवाय ‘पिठाचं वांगं’ हा पदार्थही आपल्याला आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भेसळीविरोधातील कडक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंच्या या साध्या खाद्यपदार्थांच्या आवडीची सध्या चर्चा होत आहे. त्यांच्या आवडीतून मराठवाड्यातील पारंपरिक घरगुती चवीशी असलेली त्यांची जवळीक पाहायला मिळते.