
भारताने आशिया चषक 2025 स्पर्धा जिंकली आहे. भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून नमवलं आहे. भारताचा विजय झाल्याचं जगजाहीर असलं तरी या स्पर्धेची ट्रॉफी मात्र भारताला अद्याप मिळालेली नाही.

भारताने आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख मोहनसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. नक्वी हे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचेही प्रमुख आहेत. त्यांनी याआधी काही भारतविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळेच भारताने आशिया चषक त्यांच्याकडून स्वीकारण्यास नकार दिला.

भारताच्या या भूमिकेनंतर नक्वी ट्रॉफी आणि इतर मेडल्स घेऊन थेट निघून गेले आहेत. त्यामुळे आता भारताला ही ट्रॉफी नेमकी कधी मिळणार? तसेच ट्रॉफी नेमकी कुठे आहे? असे विचारले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अजूनही ही ट्रॉफी नक्वी यांच्याकडेच आहे. त्यांनी ही ट्रॉफी भारताला देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यासाठी एक कार्यक्रम घेऊन माझ्याच हाताने ती ट्रॉफी दिली जावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे.

भारत मात्र ही अट मान्य करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता बीसीसीआयकडे ही ट्रॉफी परत मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे BCCI नियमानुसार ACC कडे किंवा ICC कडे तक्रार करू शकतो. रितसर तक्रार करून भारत ही ट्रॉफी आल्याकडे घेऊ शकतो.

दुसरा पर्याय म्हणजे नक्वी यांची अट मान्य करून ट्रॉफी घेता येईल. मात्र भारत हा पर्याय न स्वीकारण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता नियमांची लढाई लढून भारत ही ट्रॉफी परत मिळवू शकतो.