
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 4 मे रोजी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा महारविवार विशेष भाग पहायला मिळणार आहे. धनाने सर्व काही विकत घेता येतं का? संकटसमयी संपत्ती माणसाला तारू शकते का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना एका अध्यात्मिक प्रवासाची कथा प्रेक्षक अनुभवणार आहेत.

एका श्रीमंत, गर्विष्ठ व्यापाऱ्याचा अहंकार स्वामी कसा तोडून काढणार आणि कसं उत्तर मिळणार हे प्रेक्षकांना या भागात पहायला मिळणार आहे. जेथे पुण्य आणि धन यांची खरी किंमत तपासली जाईल.

स्वामी समर्थांकडे एक भयभीत मंगलदास येतो. त्याचा चमत्कारिक मृत्यू झाला आहे आणि तो जीवनदानासाठी आर्जव करतो. स्वामी त्याला एक अट घालतात "संपत्तीचा त्याग करून गोरगरिबांसाठी वाटप कर."

दुसरीकडे, एक अलौकिक तराजू एका बाजूला शांत, स्थिर, तेजस्वी स्वामी बसलेले आणि दुसऱ्या बाजूला मंगलदास एकेक सोन्याच्या भांड्यांनी वजन भरत आहे. पण त्या संपत्तीचा भार स्वामींच्या तेजस्वित्वाशी मुळीच तोंड देऊ शकत नाही. गावकरी अवाक् होऊन हे दृश्य पाहत असतात आणि अखेर त्याची संपत्ती संपते. पण पुण्य संपत नाही.

मंगलदासाच्या मनात परिवर्तन होतं. स्वामींचे शब्द मनात घर करतात. "आयुष्यभर ज्या धनाच्या पाठीमागे धावलास ते तुला वाचवू शकलं नाही, तेव्हा पुण्य कमव", हा केवळ एक अध्यात्मिक संदेश नाही, तर जीवनातल्या खऱ्या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रसंग आहे.