
मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड हे प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे.

चार दिवस हा यात्रोत्सव चालतो. पहिल्याच दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या यात्रेला २०० वर्षांची परंपरा आहे.

वाघोड येथील मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत पिंपळाच्या झाडाखाली श्री सीताराम मुंजोबा महाराजांचे देवस्थान आहे.

भाविकांच्या नवसाला पावणारा आणि श्रीक्षेत्र वाराणसी (काशी) व रावेरच्या भाविकांना घोंगडी पांघरूण लहान बालकाच्या रूपाने त्यांनी दर्शन दिले होते, अशी आख्यायिका आहे.

हा यात्रोत्सव चार दिवस चालत असल्याने भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. अनेक जण मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर याठिकाणी नवैद्य देण्याची प्रथा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. याठिकाणी विविध दुकाने सजली आहेत. खेळण्याची, प्रसादाची दुकाने आहेत. अनेक भक्त मोठ्या शहरातून यात्रेनिमित्ताने गावाकडे येतात. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. पोलिसांचा पण मोठा बंदोबस्त आहे.