
कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरात वसलेले दादासाहेब क्रीडांगण एकेकाळी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंना घडवणारे केंद्र आज महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय आणि उपेक्षित अवस्थेत आहे.

मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील खेळाडूंना अक्षरशः स्वतः झाडू मारून आणि पाणी ओतून सरावासाठी मैदान तयार करण्याची वेळ आली आहे. हे क्रीडांगण या परिसरातील एकमेव मोठे मैदान आहे.

कल्याणमध्ये जिथे दररोज सायंकाळी कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉलसह विविध खेळांचे शेकडो खेळाडू सरावासाठी येतात. मात्र मैदानावर सगळीकडे कचरा, उंच वाढलेले गवत आणि पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे खेळाडूंनाच स्वतःच्या हाताने मैदान स्वच्छ करावे लागते.

याबाबत खेळाडूंनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. आम्ही स्वतः मैदान साफ करून सराव करतो, पण महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी रोज याच मार्गाने जातात, तरीही कोणी लक्ष देत नाही, असे एका खेळाडूने सांगितले.

क्रीडांगणाच्या दयनीय अवस्थेचे मुख्य कारण म्हणजे मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी किंवा सरावासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे.

विशेषतः महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सोय नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांसाठी चेंजिंग रूम नाही, पाण्याची सोय नाही — अशा परिस्थितीत आम्ही सराव कसा करायचा? असा सवाल एका महिला खेळाडूने विचारला आहे.

मैदानाची अवस्था बिकट असतानाच, परिसरातील समस्यांनी त्यात भर घातली आहे. मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी दारुडे आणि गर्दुल्ले यांचा संचार सुरू असतो. काही जण येथे पार्ट्या करतात, ज्यामुळे खेळाडूंमध्ये सुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे.

मैदानाबाहेर फेरीवाल्यांची गर्दी आणि चारचाकी-दुचाकी वाहनांचे अतिक्रमण होत असल्यामुळे खेळाडूंना सरावापेक्षा जास्त त्रास या समस्यांचा होत आहे. या मैदानावर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो.

मात्र प्रत्यक्ष मैदानाची अवस्था अत्यंत वाईट आहे. नेते फक्त स्पर्धा सुरू करताना येतात आणि फोटो काढून जातात, पण नंतर मैदानाचं काय होतं, कोणी विचारत नाही." असा आरोप खेळाडू आणि स्थानिक नागरिक करत आहेत.