
भारतातील जेवणात वापरला जाणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थात कांदा, खोबर, खडा मसाला यांसह लसूणचा प्रामुख्याने समावेश होतो. एखाद्या पदार्थाला फोडणी द्यायची असेल किंवा जर वाटण बनवायचं असेल तर त्यात लसूण ही असतेच... लसणामुळे जेवणातील स्वादच वाढत नाही, तर ती खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुम्हाला संसर्गजन्य आजार होत नाहीत. पण लसूण ही मर्यादित प्रमाणात खाल्ली पाहिजे. कारण त्याचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ किंवा गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आपल्याला अनेकदा लसूण सोललेला खावा कि न सोललेला खावा, असा प्रश्न पडलेला असतो. तसेच जर चुकून न सोललेला लसून खाल्ला तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का, याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लसूण हा सहसा सोलून खाल्ला जातो. पण अनेकदा लोक लसूण सोलायला विसरतात. काही लोक लसूण न सोलताच जेवणात वापरतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लसणाच्या पाकळ्यांमध्ये भरपूर फायबर असते. फायबर तुमच्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. फायबर तुमचे वजन नियंत्रित ठेवते. तसेच ते वाढण्यापासूनही रोखते.

जर तुम्ही लसूण न सोलता खाल्ले तर तुम्हाला त्याचे अधिक फायदे मिळू शकतात. लसूण सालीसह खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच, लसणाची साल पदार्थ आणखी चवदार बनवते.

आयुर्वेदानुसार, लसूण सोलून खाल्ल्याने आरोग्यासाठी अनके फायदे होतात. लसणामध्ये मुख्यत: अँटिऑक्सिडंट ॲलिसिन असते. यातील अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे रक्तवाहिन्या विस्तारित होण्यास मदत मिळते. तसेच ऑक्सिजनचे सेवन सुधारते. विशेषत: प्रदूषित शहरांमध्ये राहणारे लोक, मॅरेथॉन धावपटू, ट्रेकर्स व पर्वतारोहक लसणाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात.

लसूण खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. हे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी लसूण खावे.

लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

(टीप: आरोग्याशी संबंधित कोणताही सल्ला घेण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.)