
चार चाकी वाहन पंक्चर झाल्यानंतर जॅकच्या मदतीने टायर उचलण्यात येते, हे आपण पाहिले आहे. मात्र नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथे चक्क एका बाजूला झुकलेली दुमजली इमारत जॅकच्या सहाय्याने उचलून सरळ करण्याचे काम सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद या ठिकाणी हे महत्त्वाचे काम सुरू आहे. हे काम उत्तर महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.

ताहाराबाद येथील ही दुमजली इमारत बीम तुटल्यामुळे एका बाजूला झुकू लागली होती. यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होईल, असा धोका निर्माण झाला होता.

हा धोका लक्षात घेता, घरमालकाने इमारत पाडण्याऐवजी ती सरळ करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पानिपत येथील 'माँ दुर्गा कन्स्ट्रक्शन कंपनी'ला हे विशेष काम सोपवले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून १० ते १२ मजूर या कामावर कार्यरत आहेत. सुमारे दीडशे जॅक लावून ही दीड ते दोन फूट झुकलेली इमारत सरळ करण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी ४ ते ५ दिवस लागतील.

या संपूर्ण कामासाठी घरमालकाला अंदाजे साडेसहा लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. हे काम सुरू झाल्यापासूनच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

या कामावर असलेले मजूर सांगतात की, "दीडशे जॅक लावून ही दीड ते दोन फूट झुकलेली इमारत सरळ करण्याचे काम आम्ही करत आहोत. यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून दहा ते बारा मजूर रोज काम करत आहेत."

ही झुकलेली इमारत सरळ झाल्यानंतर पुढील शंभर वर्षे या इमारतीला कोणताही धोका राहणार नाही. यामुळे केवळ इमारतीची सुरक्षितता सुनिश्चित होणार नाही, तर स्थानिकांसाठी हे अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे, असे मजुरांनी म्हटले आहे.