
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईलाही पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईत तर रस्त्यांवर पाणी तुंबले असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकल सेवा मंदावली असून रस्त्यांवरील ट्रॅफिकही स्लो झाले आहे.

दरम्यान, आता मुंबई, उपनगरांत तुफान पाऊस कोसळत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असणार की चालू राहणार? असा प्रश्न पालक तसेच विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. याबाबत आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती देत संभ्रम संपवला आहे.

मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या पावसाचा फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. मुंबईत पुढच्या दहा ते बारा तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच मुंईला रेड अलर्ट देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

सध्या मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता आम्ही मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचा आदेश दिला आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच आजच्या पावसाची स्थिती लक्षात घेता दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्याचा आदेश महापालिकेने दिल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

तसेच, आगामी 10 ते 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रात तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी आलेल्या हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी द्यायची की नाही हे ठरवले जाईल. संध्याकाळी मुंबई पालिकेकडून तसे आदेश देण्यात येतील, अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे.