
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, मराठवाडा, विदर्भ यांसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबईत पावसाची संततधार सुरु असून याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सतत कोसळणऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात पुढील ४८ तास मुंबईसह महाराष्ट्राला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज हा सर्वमान्य असतो, पण त्यासोबतच भारतीय ज्योतिषशास्त्रामध्येही पाऊस किती पडेल, कसा पडेल आणि तो समाधानकारक असेल का, हे सांगण्यासाठी एक पारंपरिक पद्धत वापरली जाते.

ही पद्धत नक्षत्रे आणि त्यांच्या वाहनांवर आधारित आहे. यावरुन यंदा कोणत्या दिवसात किती पाऊस पडेल आणि तो कशा स्वरुपाचा असेल याचा अंदाज बांधला जातो. अनेकदा ही पद्धत अचूक ठरते.

आपल्याकडे एकूण २७ नक्षत्रे आहेत. या २७ नक्षत्रांपैकी पावसाळ्यात सूर्य साधारणपणे नऊ नक्षत्रांमधून प्रवास करतो. प्रत्येक नक्षत्राला एक विशिष्ट वाहन (प्राणी) असते आणि या वाहनावरूनच त्या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचे स्वरूप ठरवले जाते.

या वाहनांमध्ये हत्ती, बेडूक, घोडा, मेंढा, म्हैस, मोर, गाढव किंवा उंदीर अशा प्राण्यांचा समावेश असतो. ही नक्षत्रांची वाहने कशी ठरतात आणि त्यावरून पावसाचा अंदाज कसा घेतला जातो, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

ज्या नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल, त्या वेळी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते. तर जेव्हा घोडा वाहन असतो, तेव्हा पाऊस प्रामुख्याने डोंगराळ आणि पठार भागात जास्त पाऊस पडतो. जर कोल्हा किंवा मेंढा वाहन असेल तर पाऊस फार कमी किंवा तुरळक स्वरूपात पडतो.

त्यासोबतच जर मोर, गाढव किंवा उंदीर वाहन असल्यास पाऊस अनियमित आणि हलक्या स्वरुपाचा पडतो. आता शनिवारी १६ ऑगस्टपासून सूर्याने मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि त्याचे वाहन बेडूक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बेडूक हे वाहन असते, तेव्हा जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे सध्या जोरदार पाऊस पडत आहे. आता येत्या ३० ऑगस्टला सूर्याचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यावेळी त्याचे वाहन म्हैस असेल. त्यामुळे तेव्हाही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे.

यानंतर आता १३ सप्टेंबर रोजी सूर्याचा उत्तर फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि तेव्हा कोल्हा हे वाहन असेल. यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पावसाच्या काळात हवामान खात्याचे अंदाज महत्त्वाचे असले तरी, नक्षत्रांची वाहने पाहून पावसाचा अंदाज लावण्याची ही पारंपरिक पद्धत आजही अभ्यासली जाते. अनेकदा शेतकरी याच अंदाजानुसार पेरणीची काम करतात. ही पद्धत अनेकदा बरोबरही ठरते, असे म्हटले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) - सर्व फोटो - PTI