
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे दोन जुळ्या बहिणींचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतो, याने आपल्या अडीच वर्षाच्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता.

प्रवासादरम्यान नवरा- बायको यांच्यात वाद सुरु झाला. या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. तर राहुल आपल्या मुलींसह पुढे आपल्या निघाला होता.

पण याच वेळी रागाने भरलेल्या स्थितीत खामगाव - जालना मार्गावरील अंढेरा फाटा जवळील जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयपणे हत्या केली.

ही घटना 21 तारखेची असून घटनेनंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले. संपूर्ण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.. सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलीसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.