
सध्या सर्वत्र मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकची चर्चा रंगली आहे. एक्स अकाऊंट आणि इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. तसेच तिला न्यू नॅशनल क्रश असे ही बोलले जात आहे. गिरीजाने आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. करिअरच्या सुरुवातीला तिने काही जाहिरांतीमध्ये देखील काम केले आहे. गिरीजाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आता उत्सुक आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. तो ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

गिरीजाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये मैत्रिण कशी असावे? हे सांगितले आहे. ती म्हणाली, माझी अशी एक मैत्रिण आहे, थोडं विचित्र वाटेल.. पण जर तुम्ही हातात फोन घेतलात आणि कोणाला तरी फोन करुन सांगितलं की माझ्या घरी पाणी नाही. मी तुझ्या घरी अंघोळीला येत आहे. या पेक्षा आणखी काय कम्फर्ट असू शकतो. माझी ती मैत्रिण आहे सायली. ती माझी खूप जूनी मैत्रिण आहे. खरं तर ती माझ्या नवऱ्याची मैत्रिण आहे. सायली माझ्या नवऱ्याची कॉलेज मैत्रिण आहे. पण मी तिला हडपले आहे. त्यामुळे ती आता पूर्णपणे माझी मैत्रिण आहे.

पुढे गिरीजा म्हणाली, सायली पुण्यात राहाते. पुण्यात दोन-तीन वेळा असे झाले की पाईपलाइच्या कामामुळे, एकदा जोरदार पावसामुळे वीजेचा खांब कोसळला होता. काही लोकांचा जीव गेला होता. त्यामुळे आमच्या संपूर्ण परिसरातील वीज कट केली होती. जवळपास दोन ते तीन दिवस लाईट नव्हती. पुण्यात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात हे घडले होते. त्याच वेळी पाणी नव्हते. पंपाने पाणीच वर चढत नव्हते. घरात पाणीच येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये मी तिला फोन केला आणि म्हटले मी तुझ्या घरी अंघोळीला येते.

मी सायलीच्या घरी अनेकदा अंघोळीला गेले आहे. अशीच एक मैत्रीण आहे निशीगंधा, ती पण पुण्यात राहाते. तिच्या घरी देखील जाऊन मी अंघोळ केली आहे. हे सगळे माझे कुटुंबासारखे फ्रेंड्स आहेत. मला त्यांच्या घरी गेल्यानंतर विचारही करावा लागत नाही की अंघोळ केल्यानंतर मी थोडावेळ बसले तर मला जेवण मिळेल की नाही? त्यांनी गृहीत धरलेले असते की आता ती येणार आहे तर जेवूनच जाणार असे गिरीजा म्हणाली.

गिरीजाचे काही सिंपल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ती न्यू नॅशनल क्रश ठरली आहे. हे फोटो तिच्या एका मुलाखतीमधील होते. तिने मुलाखतीमध्ये फिकट निळ्या रंगाची प्लेन अशी कॉटनची साडी नेसली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. मोकळे केस, गळ्यात सिंपल नेकलेस, हातात बांगड्या घातल्या आहेत. या सिंपल लूकमध्ये गिरीजा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंनी अनेकांना घायाळ केले आहे.