
मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झालं. प्रथमेश हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, रील स्टार आणि डान्सर होता. आजारपणामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. प्रथमेशच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

'द संडे गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रथमेशकडे जवळपास 10 ते 50 लाख रुपयांची संपत्ती आहे. इन्स्टाग्राम स्पॉन्सरशिप, रील मॉनिटायझेशन आणि ब्रँड प्रमोशनमधून तो कमाई करायचा. याशिवाय त्याच्या गाण्याचे अल्बमसुद्धा प्रदर्शित व्हायचे.

डिसेंबर 2024 मध्ये त्याने मुंबईतील 'मेट गाला'च्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्टेज शेअर केला होता. प्रथमेशच्या करिअरमधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण होता. त्यावेळी त्याने स्वप्न सत्यात उतरल्याची भावना व्यक्त केली होती.

प्रथमेशचे विनोदी इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूब व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. या रील्स आणि व्हिडीओंमध्ये तो अनेकदा त्याच्या आईसोबत झळकायचा. सर्वसामान्य मराठी कुटुंबाच्या जीवनातील प्रसंग, विनोदी स्किट्स आणि डान्स यांवर आधारित त्याचे व्हिडीओ असायचे.

इन्स्टाग्रामवर प्रथमेशचे 1,87,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. युट्यूबरही त्याचे 16,700 पेक्षा दास्त सबस्क्राइबर्स आहेत. इन्फ्लुएन्सरसोबतच तो अभिनेता, कोरिओग्राफर आणि डान्सरसुद्धा होता. त्याने विविध मराठी म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलंय.