
मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेकदा फ्री वे वरून आल्यानंतर नरिमन पॉईंटकडे जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

हा भुयारी मार्ग कोस्टल रोड ते फ्री वे असा जोडला जाणार असल्याने वाहतूक कोंडीतून याची लवकरच सुटका होणार आहे. आज एमएमआरडीएकडून या भुयारी मार्गाचं टीबीएम लॉन्चिंग करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनआथ शिंदे यांच्या हस्ते हे लॉन्चिंग पार पडले.

हा भुयारी मार्ग ईस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) आणि मुंबई कोस्टल रोड (मरीन ड्राईव्ह) यांना जोडणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारेल. या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल. तसेच इंधनाची बचत होण्यासोबतच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किलोमीटर असून. त्यातील जवळपास ७ किलोमीटर भाग हा भुयारी मार्ग असेल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार ०५६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण ५४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे साधारण डिसेंबर २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असे बोललं जात आहे.

हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प आहे, जो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून जाणार आहे. हा बोगदा मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या सुमारे ५० मीटर खालून जाणार आहे. जे एक मोठे तांत्रिक आव्हान असणार आहे.

या प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते आणि १ पदरी आपत्कालीन रस्ता असेल. या दोन्ही बोगद्यांमध्ये वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी/तास इतकी असेल. तसेच सुरक्षेसाठी, दोन्ही बोगदे एकमेकांना प्रत्येक ३०० मीटर अंतरावर क्रॉसपॅसेज द्वारे जोडले जातील.

यामध्ये पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी यांत्रिकीकरण, आग प्रतिरोधक यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक नियमनासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) ची सोय असेल. या प्रकल्पासाठी स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात आली.

हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईच्या किनारी भागातील मिश्र आणि खडकाळ भूस्तरात अचूक आणि सुरक्षित खोदकाम करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आहे. हेच तंत्रज्ञान कोस्टल रोड प्रकल्पातही वापरले गेले आहे. याचा कटर हेड व्यास १२.१९ मीटर आहे. तर लांबी ८२ मीटर आणि वजन अंदाजे २,४०० मेट्रिक टन इतके आहे. सध्या प्रकल्पाची भौतिक प्रगती १४ टक्के झाली आहे. हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.