
लॉकडाऊनमुळे आजकाल प्रत्येकजण घरात बंदिस्त झाला आहे. कोरोनामुळे थिएटर देखील बंद आहेत, म्हणून आजकाल प्रत्येकजण घरी बसूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचा आणि वेब सीरीजचा आनंद घेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सध्या अनेक शोज ट्रेंड होत आहेत. जर आपण देखील घरी बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर नेटफ्लिक्सवरचे हे शो आवर्जून बघाच!.

फ्रेंड्स रीयुनियन : 90च्या दशकातील लोकप्रिय कॉमेडी शो ‘फ्रेंड्स’चा ‘फ्रेंड्स रियुनियन’ हा शेवटचा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर ‘फ्रेंड्स रियुनियन’ पाहू शकता. यंदाचा हा सीझन पहिल्या इतर सीझनपेक्षा खूप वेगळा आहे. या सीझनमध्ये ना कोणी अभिनय करत आहे ना कोणी कोणतीही भूमिका साकारत आहे. त्याऐवजी सर्व कलाकार त्यांच्या वास्तविक रूपामध्ये दिसत आहेत. प्रत्येकजण या सीरीजच्या पहिल्या सीझनमधील जुने किस्से सांगत आहे. या सीझनला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. नेटफ्लिक्सवरील या शोचे रेटिंगही चांगले आहे. या शोमध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुद्रो, मॅट लीब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वीमर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुन्हा एकदा सर्वांना एकत्र पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

ल्युसिफर : ल्युसिफरचा सीझन 2 पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजक आहे. यामध्ये बाप-मुलाचे काही सीन आहेत, जे खूप मजेदार आहेत आणि हृदयस्पर्शी देखील आहेत. या वेळी लेखकांनी पटकथा अधिक मनोरंजक बनवली असून, कलाकारांचा अभिनय आणखीन प्रेक्षणीय झाला आहे. ल्युसिफर अनेक ट्विस्ट्स आणि वळणांसह नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे.

अजीब दास्तान : 4 वेगवेगळ्या लोकांच्या जीवनाची कहाणी या कथेत दर्शवली आहे. 4 वेगवेगळे प्रतिभावान दिग्दर्शक शशांक खेतान, राज मेहता, नीरज घेवन आणि केयोज इराणी यांनी बनवले आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा, कोंकणा सेन शर्मा, आदिती राव हैदरी, शेफाली शाह, फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, अरमान, अभिषेक बॅनर्जी, इनायत वर्मा, मना कौल आणि तोता रॉय या कलाकारांचा समावेश आहे. करण जोहरने या शोची निर्मिती केली आहे.

बॉम्बे बेगम : बॉम्बे बेगममध्ये एकूण 5 अभिनेत्री आहेत, ज्यात एक सोडून इतर 4 श्रीमंत आणि उच्च वर्गातील आहेत. या वेब सीरीजच्या माध्यमातून पूजा भट्टने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे. या मालिकेत पूजा भट्ट व्यतिरिक्त सुहाना गोस्तवानी, आद्या आनंद, अमृता सुभाष, प्लबीता बोर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या शोमध्ये महिलांच्या आयुष्यातील अडचणी दर्शवल्या गेल्या आहेत.