
राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. म्हणूनच या मालिकेनं अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्यात 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने सर्वाधिक आठ पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे छोट्या पडद्यावरील ही सर्वांत लोकप्रिय मालिका ठरत आहे.

लोकप्रिय मालिका, लोकप्रिय कुटुंब, लोकप्रिय जोडी, लोकप्रिय नायक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट जावई अशा विविध विभागांमध्ये या मालिकेने पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

एजेच्या जहागीरदार कुटुंबाला लोकप्रिय कुटुंबाचा पुरस्कार मिळाला असून एजे आणि लीलाने लोकप्रिय जोडीचा पुरस्कार पटकावला आहे. लोकप्रिय नायक एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापट ठरला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेचा पुरस्कार दुर्गाला मिळाला.

लीला आणि एजेनं सर्वोत्कृष्ट सून आणि सर्वोत्कृष्ट जावयाचाही पुरस्कार आपल्या नावे केला. हे पुरस्कार स्वीकारताना राकेश बापट मंचावर भावूक झाला होता. यावेळी त्याची आईसुद्धा मंचावर आली होती.